विजेबाबत ‘निंबळक’ची स्वयंपूर्णतेकडे झेप!
By Admin | Updated: July 14, 2014 00:59 IST2014-07-14T00:36:49+5:302014-07-14T00:59:00+5:30
नागेश सोनवणे , अहमदनगर मीटर पद्धतीच्या पाणी पुरवठ्यामुळे राज्यात नावलौकिक मिळवलेल्या निंबळक ग्रामपंचायतीने आता त्यापुढे जाऊन वीज निर्मितीसाठी बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे ठरविले आहे

विजेबाबत ‘निंबळक’ची स्वयंपूर्णतेकडे झेप!
नागेश सोनवणे , अहमदनगर
मीटर पद्धतीच्या पाणी पुरवठ्यामुळे राज्यात नावलौकिक मिळवलेल्या निंबळक ग्रामपंचायतीने आता त्यापुढे जाऊन वीज निर्मितीसाठी बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे ठरविले आहे. एम.आय.डी.सी.तील कारखान्यांतून ओला-सुका तसेच प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन करून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी पुढाकार घेतल्यामुळे आता निंबळक ग्रामपंचायत विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे.
या प्रकल्पामुळे गावातील सर्व पथदिवे व सार्वजनिक ४०० दिवे कायम स्वरुपी सुरू राहतील. त्याच प्रकल्पातून विविध प्रकारच्या उत्पादनामधून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. निंबळक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व कारखान्यामधला ओला, सुका कचरा गोळा करण्यात येणार आहे. त्याचा उपयोग करूनच निंबळकला बायोगॅस प्रकल्प उभा करणार आहे. विशेष म्हणजे कारखान्यामधील कचरा जमा होणार असल्याने कारखाने परिसर तसेच एम.आय.डी.सी. परिसर स्वच्छ राहणार आहे. या कचऱ्याचे संकलन करून ग्रामपंचायत वीज निर्मिती करणार आहे.
तसेच प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून डांबरयुक्त वस्तुचे उत्पादन करणार असल्याने या उत्पादनाची ग्रामपंचायतीच्या वतीने विक्री करण्यात येणार आहे.
गावात पर्यावरण संतुलित समृद्ध गाव योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचे नियोजन आहे. या वृक्षांच्या संवर्धनासाठी तसेच पाण्यासाठी गावातील सर्व सांडपाणी एकत्र करून ते जलवाहिनीच्या माध्यमातून एकत्र करून फिल्टरेशन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हेच शुद्ध झालेले पाणी वृक्षांना वापरण्यात येणार आहे.
लोणांद पॅटर्न निंबळकमध्ये
पुणे जिल्ह्यातील लोणांद येथे वीज निर्मितीसाठी अशा प्रकारचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला आहे. अशा प्रकल्पाची पाहणी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, सरपंच विलासराव लामखडे, उपसरपंच अशोक पवार, विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, ग्रामविकास अधिकारी युवराज ढेरे, उद्योजक के.गोपाळकृष्णन करणार आहे. या प्रकल्पामुळे विजेच्या बिलातही घट होणार असून, पर्यावरणाचे संतुलन राखण्यात मदत होणार असल्याचे सरपंच लामखडे यांनी सांगितले.
संपूर्ण गावच वाय-फाय झोन
गावातील सर्व अंगणवाड्या, जि.प. शाळा, डिजीटल बनवून त्यांना आय.एस.ओ. हे नामांकन मिळवून प्रत्येकाला इंटरनेटचा वापर करता यावा यासाठी संपूर्ण गावात वाय-फाय झोन बसविण्यात येणार आहे. वाय-फाय झोन बसविणारी ही ग्रामपंचायत महाराष्ट्रात एकमेव ठरेल.
संपूर्ण गावात कॅमेरे
वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी व गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निंबळक ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रत्येक चौकात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे.
प्रदूषणाला आळा बसेल
एम.आय.डी.सी. येथील कारखाने कंपनीमधील कचरा उघड्यावर टाकून पेटवून देत होते. यामुळे परिसरात प्रदूषण व मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत होती. या प्रकल्पामुळे प्रदूषण व दुर्गंधी कायमची नाहीशी होणार आहे.