निळवंडे धरण भरले; दहा हजार क्यूसेकने पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST2021-09-14T04:25:11+5:302021-09-14T04:25:11+5:30

राजूर : भंडारदरापाठोपाठ निळवंडे धरणही भरले असून, सोमवारी निळवंडे धरणातून दहा हजार ७५६ क्यूसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले ...

Nilwande dam filled; Ten thousand cusecs of water released | निळवंडे धरण भरले; दहा हजार क्यूसेकने पाणी सोडले

निळवंडे धरण भरले; दहा हजार क्यूसेकने पाणी सोडले

राजूर : भंडारदरापाठोपाठ निळवंडे धरणही भरले असून, सोमवारी निळवंडे धरणातून दहा हजार ७५६ क्यूसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वाहू लागली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाळ्यात प्रथमच प्रवरामाई दुथडी भरून वाहू लागली आहे.

रविवारी सकाळी ११ वाजता भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले होते. भंडारदरा धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली. हे पाणी निळवंडे धरणात पोहोचल्याने सोमवारी दुपारी निळवंडे धरणही भरले. या धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी दुपारी दीडनंतर या धरणाच्या वक्र दरवाजांमधून प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले, तर वीजनिर्मितीसाठी ६८५ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. धरणात होत असलेल्या नवीन पाण्याची आवक विचारात घेता सायंकाळी विसर्गात मोठी वाढ करीत दहा हजार ७५६ क्यूसेकने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांनी सांगितले. दरम्यान, भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पाऊस सुरूच असल्याने भंडारदरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवून नऊ हजार ८९२ क्यूसेक करण्यात आला आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे महिनाभराच्या दीर्घ विश्रांतीनंतर मागील सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे रविवारी भंडारदरा धरण भरले आणि या धरणातून सात हजार ७४४ कूसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. या पाण्याबरोबरच निळवंडे पाणलोट क्षेत्रातील ओढे नालेही दुथडी भरून वाहत आहेत. हे सर्व पाणी निळवंडे जलाशयात येत आहे. त्यामुळे निळवंडे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत गेली. सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास या धरणातील पाणीसाठा ९४ टक्के म्हणजेच सात हजार ७३१ दशलक्ष घनफुटापर्यंत पोहोचला आणि धरण तांत्रिक दृष्ट्या भरल्याचे जाहीर करीत या धरणाच्या वक्र दरवाजांतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला या धरणातील विसर्ग तीन हजार ३६० क्यूसेक इतका होता. मात्र धरणात होत असलेल्या नवीन पाण्याची आवक लक्षात घेत धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तीन तासांनंतर या विसर्गात वाढ करत सायंकाळी ५ वाजता तो आठ हजार १४४ क्यूसेक इतका करण्यात आला. दरम्यान, भंडारदरा धरणातून विसर्ग वाढविण्यात आलेला होता. त्यामुळे निळवंडेकडील पाणी आवक लक्षात घेता सायंकाळी ७ वाजता निळवंडे धरणातून दहा हजार ७५६ क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला.

सोमवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत रतनवाडी येथे सुमारे आठ इंच म्हणजेच १९५ मिमी पावसाची नोंद झाली, तर घाटघर येथे १३४ मिमी, पांजरे येथे १३५ मिमी, भंडारदरा येथे १३३ मिमी, वाकी येथे १२३ मिमी पावसाची नोंद झाली.

Web Title: Nilwande dam filled; Ten thousand cusecs of water released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.