‘निळवंडे’प्रश्नी हजारो शेतकरी रस्त्यावर
By Admin | Updated: July 11, 2014 00:56 IST2014-07-11T00:39:33+5:302014-07-11T00:56:54+5:30
संगमनेर : निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने गुरूवारी हजारो शेतकऱ्यांनी जनावरांसह तळेगाव चौफुलीवर तीन तास रास्ता रोको केला.

‘निळवंडे’प्रश्नी हजारो शेतकरी रस्त्यावर
संगमनेर : अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांतील १८२ दुष्काळी गावांना निळवंडे धरणाचे हक्काचे पाणी मिळावे, मूख कालव्यांसाठी ५०० कोटींचा निधी द्यावा, उपसा सिंचन योजना रद्द कराव्यात, या मागण्यांसाठी निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने गुरूवारी हजारो शेतकऱ्यांनी जनावरांसह तळेगाव चौफुलीवर तीन तास रास्ता रोको केला.
‘निळवंडे’चे पाणी दुष्काळी १८२ गावांना मिळावे म्हणून पाटपाणी कृती समितीने जनजागरण केले. तालुक्याचा दुष्काळी भाग पाण्यापासून वंचित असताना उपसा सिंचन योजनांना मंजुरी दिली. तळेगाव परिसराला टँकरचे पाणी प्यावे लागते. केंद्रीय जल आयोगाचा निधी मंजूर होतो. मात्र मूख कालव्यासाठी ५०० कोटी मंजूर होवूनही गेल्या ४५ वर्षांपासून हा भाग तहानलेला आहे. राज्यातील अनेक धरणे इंग्रजांनी पूर्ण केली. मात्र आमच्या राज्यकर्त्यांना निळवंडे पूर्ण करता न आल्याने कित्येक गावांचे स्मशान झाले, असा आरोप समितीचे अध्यक्ष गंगाधर गमे यांनी केला. पोखरी हवेली, माळेगाव, वडगाव पान, कौठे कमळेश्वर, तळेगाव व परिसरातील अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत. मात्र आमच्या हक्काचे पाणी औरंगाबादला जाते, हे कुणाच्या फायद्याचे आहे? असा सवाल मारूती गडगे यांनी केला. प्रवरा पट्ट्यातील गावांना उपसा सिंचन योजनांची परवानगी दिल्याने आपसात भांडणे उभी राहतील. अनेकजण निळवंडेच्या पाण्यावर हक्क सांगतात. मग आमच्या हक्काचे नेमके पाणी तरी किती मिळणार? याची वाट शेतकरी ४५ वर्षांपासून पाहत आहेत. लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर डाळिंब पाण्याअभावी संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या उपसा जलसिंचन योजना रद्द कराव्यात, अशी मागणी राजेंद्र सोनवणे यांनी केली. मच्छिंद्र दिघे, विठ्ठल घोरपडे, जगन्नाथ लोंढे, रमेश दिघे, राजेंद्र सोनवणे, करूलेचे उपसरपंच आहेर, अरूण पाटील, नानासाहेब शेळके, भास्करराव काळे, गंगाधर रहाणे, गणपत दिघे यांची भाषणे झाली.
यावेळी नानासाहेब जवरे, सुदाम सोनवणे, शरद थोरात, भिमराज चत्तर, कैलास वाक्चौरे, विजय वहाडणे, अमर कतारी आदींसह हजारो शेतकरी जनावरांसह उपस्थित होते. तळेगाव-संगमनेर रस्ता पूर्णपणे ठप्प झाल्याने वाहतूक अन्य मार्गांनी वळविण्यात आली. तालुका पोलीस निरीक्षक संजय भामरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. (प्रतिनिधी)
‘निळवंडे’ ही आमची भाकर आहे. कोणत्या व्यक्ती किंवा पक्षाकडून आंदोलनास मदत घेतली नाही. कालव्याचे काम पूर्ण होवून या भागाला पाणी मिळावे, ही मागणी आहे. दुष्काळामुळे गावांचे स्मशान होणे टाळण्यासाठी कृती समिती स्थापन केली आहे. कालव्यांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा. अन्यथा इंग्लंडच्या पार्लमेंटला पत्र लिहून ‘भंडारदरा’ प्रमाणे ’निळवंडे’ बांधून देण्याची मागणी करावी लागेल. कारण राज्यातील अनेक धरणे इंग्रजांनीच बांधलेली आहेत. ४५ वर्षे तहानलेल्या शेतकऱ्यांना द्यायला आमच्या राज्यकर्त्यांजवळ काहीही नाही.
- गंगाधर गमे,
अध्यक्ष कृती समिती