निळवंडे धरण ओव्हरफ्लो
By Admin | Updated: September 3, 2014 23:58 IST2014-09-03T23:35:56+5:302014-09-03T23:58:16+5:30
राजूर/अकोले: गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी भंडारदरा धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे प्रवरा पात्रातील निळवंडे धरणही आज सकाळी साडेसात वाजता तुडूंब भरले.

निळवंडे धरण ओव्हरफ्लो
राजूर/अकोले: गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी भंडारदरा धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे प्रवरा पात्रातील निळवंडे धरणही आज सकाळी साडेसात वाजता तुडूंब भरले. दुपारी दोन वाजता धरणाच्या भिंतीवरून पाणी प्रवरा पात्रात झेपावले.
यावर्षी पंधरा आॅगस्टपूर्वी भंडारदरा धरण भरले. यानंतर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना निळवंडे भरण्याची उत्सुकता होती. मात्र पंधरा आॅगस्टनंतर पाणलोटातील पाऊस मंदावला आणि निळवंडे भरण्याची प्रतिक्षाही ताणली. रविवारपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाने जोरदार कमबॅक केले आणि भंडारदरा ओव्हरफ्लो होत सुमारे ४ हजार २०० क्युसेकपर्यंत पाणी सोडावे लागले. बुधवारी सकाळी निळवंडे काठोकाठ भरले.
निळवंडे धरणाच्या भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. या भिंतींच्या मधोधम नदीपात्रापासून ६४१.५० मीटर तलांकावर सहा लोखंडी वक्र दरवाजे बसविणे बाकी आहे. त्यामुळे यावर्षी धरणात ६ हजार ५३२ दशलक्ष घनफूट पाणी साठविण्यात येणार आहे. रात्रीपासून भंडारदऱ्याच्या पाणलोटात पाऊस कमी झाल्याने धरणातून सोडण्यात येत विसर्गही कमी झाला. सकाळी १ हजार ४२१ क्युसेकचा विसर्ग सुरू होता तर निळवंडेतून १ हजार २०० चा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या भिंतीवरून पाणी पडत नव्हते. (वार्ताहर)
पाण्याची आवक कमी
बुधवारी दुपारी १२ वाजता भंडारदरा धरणाचे वक्र दरवाजेही बंद करण्यात आले त्यामुळे निळवंडेत येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली. अखेर दुपारी १२ वाजता धरणाच्या भिंतीवरून ६५ क्युसेकने पाणी प्रवरा पात्रात पडू लागले आणि निळवंडे ओव्हरफ्लो झाले.