निलेश लंके यांनी दिले अण्णांना पुरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:25 IST2021-08-22T04:25:10+5:302021-08-22T04:25:10+5:30
अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबतचे सर्व पुरावे आमदार निलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ...

निलेश लंके यांनी दिले अण्णांना पुरावे
अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबतचे सर्व पुरावे आमदार निलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दिले आहेत. या प्रकरणी वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, पण असे अधिकारी तालुक्यात नकोत, अशी भूमिका अण्णा हजारे यांनी घेतली आहे. त्यामुळे देवरे यांच्यापुढील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
ज्योती देवरे यांची आत्महत्येचा इशारा देणारी स्वत:च्या आवाजातील क्लिप शुक्रवारी प्रसारीत झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यात आमदार निलेश लंके यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्याअनुषंगाने आमदार लंके यांनी शनिवारी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्याने व्यथित होऊन त्यांनी ही क्लिप समाजमाध्यमांवर टाकली, असे लंके यांनी अण्णांच्या निदर्शनास आणून दिले. देवरे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारी, त्याची चौकशी, त्यात त्या दोषी आढळून आल्याचे पुरावे लंके यांनी अण्णांना दिले. देवरे यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपातही तथ्य आढळून आले आहे. प्राप्त तक्रारींवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई अटळ होती. त्यामुळेच देवरे यांनी ही क्लिप व्हायरल केली, असे आमदार लंके यांनी अण्णांना सांगितले.