व्यवसायासाठी आलेले नायजेरियन झाले ‘सायबर दरोडेखोर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST2021-02-05T06:38:49+5:302021-02-05T06:38:49+5:30
अहमदनगर : बिझनेस व्हिजावर भारतात आलेल्या नायजेरियन तरुणांनी व्यवसायाऐवजी ऑनलाईन फसवणुकीचा धंदा सुरू करत अनेकांना लाखो रुपयांनी गंडा घातल्याचे ...

व्यवसायासाठी आलेले नायजेरियन झाले ‘सायबर दरोडेखोर’
अहमदनगर : बिझनेस व्हिजावर भारतात आलेल्या नायजेरियन तरुणांनी व्यवसायाऐवजी ऑनलाईन फसवणुकीचा धंदा सुरू करत अनेकांना लाखो रुपयांनी गंडा घातल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या ऑनलाईन दरोडेखोरीत आणखी नायजेरियन सक्रिय असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
पिंपरी-चिंचवड येथे राहत असलेल्या या टोळीने नगर येथील हॉटेल चालकास व्यवसायाचे आमिष दाखवून त्याची १४ लाख १७ हजार रुपयांनी फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर येथील सायबर पोलिसांनी पाच दिवसापूर्वी पिंपरी-चिंचवड येथून तीन नायजेरियन तरुणासह एका भारतीय तरुणीस अटक केली. त्यांच्याकडून विविध बँकांचे पाच पासबुक, एटीएम कार्ड, चेकबुक, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. भारतीय तरुणीला हाताशी धरून या नायजेरियन आरोपींनी राहत्या फ्लॅटमध्ये फसवणुकीचे कॉल सेंटरच सुरू केले होते. हे तिन्ही नायजेरियन भारतात बिझनेस व शैक्षणिक व्हिजावर आलेले आहेत. यातील एक जण तब्बल सात वर्षांपासून भारतात राहत आहे तर उर्वरित दोघे चार वर्षांपासून राहत आहेत. या नायजेरियनना अस्खलित हिंदी बोलता येत नसल्याने त्यांनी गुजरात येथील नीलम गिरीश गोहेल ऊर्फ निशा शहा हिला हाताशी धरून लोकांची ऑनलाईन फसवणूक सुरू केली. यासाठी नीलम हिचे विविध बँकांमध्ये खाते उघडण्यात आलेले आहे. या बँक खात्याची पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे. तसेच टोळीने एकूण किती जणांची फसवणूक केली, याचाही शोध सायबर पोलिसांनी सुरू केला आहे.
अशी आहे फसवणुकीची पद्धत
सायबर गुन्हेगार प्रथम फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करतात. अकाऊंटधारक व्यक्ती महिला अथवा पुरुष परदेशात स्थायिक असून, एका मोठ्या कंपनीत अधिकारी असल्याचे भासविले जाते. या अकाऊंटच्या माध्यमातून प्रथम फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून समोरील व्यक्तीशी मैत्री केली जाते. त्यानंतर त्या व्यक्तीला गिफ्ट अथवा व्यवसायाचे आमिष दाखविले जाते. परदेशातून तुमच्या नावावर पैसे येणार असल्याचे सांगून वेगवेगळे कर भरण्यास सांगितले जाते अथवा तुम्ही परदेशातून काळा पैसा मागितला आहे असे सांगून ब्लॅकमेल करत पैसे घेतले जातात. यासाठी या टोळीतील सदस्यच कस्टम अधिकारी, रिझर्व्ह बँकेतील अधिकारी असे वेगवेगळ्या नावाने फाेन करतात. फसवणूक झाल्यानंतर बदनामी हाेईल या भीतीपोटी बहुतांश जण तक्रार देत नाहीत.
------------------------------------------
पिंपरी-चिंचवड येथून अटक केलेल्या सायबर गुन्हेगारांची सखोल चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडे मिळालेल्या मुद्देमालावरून या टोळीने एकूण किती जणांची फसवणूक केली आहे, त्याचा तपास सुरू आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तीने दाखविलेल्या आमिषांना बळी पडू नये तसेच त्यांच्यासोबत कुठलेही ऑनलाईन व्यवहार करू नये.
- मधलकर साळवे, पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, अहमदनगर
फोटो ०३ फसवणूक