नववर्षाचा शाळांमध्ये श्रीगणेशा
By Admin | Updated: June 15, 2016 23:46 IST2016-06-15T23:37:52+5:302016-06-15T23:46:34+5:30
शेवगाव : शेवगाव तालुक्यात ठिकठिकाणी प्रभातफेरी, मुलांचे गुलाबपुष्प देवून स्वागत, विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण आदी उपक्रमांनी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला.

नववर्षाचा शाळांमध्ये श्रीगणेशा
शेवगाव : शेवगाव तालुक्यात ठिकठिकाणी प्रभातफेरी, मुलांचे गुलाबपुष्प देवून स्वागत, विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण आदी उपक्रमांनी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला. ठिकठिकाणी वाड्या- वस्त्यांवरील विद्यार्थ्यांची बैलगाडी, ट्रॅक्टर आदी वाहनांतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शाळेत नव्याने दाखल झालेल्या मुलींचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
शेवगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत शाळा प्रवेशोत्सव उपक्रम उत्साहात पार पडला. मंगळवारी शाळापूर्व दिवशी गावागावात लाऊडस्पीकरवरून १५ जूनपासून शाळा सुरू होत असल्याचे सांगून घरभेटी, शैक्षणिक पदयात्रा या माध्यमातून विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. नवीन प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांचे फॉर्म भरून घेण्यात आले. शाळा परिसर स्वच्छ करणे, सडा शिंपून रांगोळी काढणे, पानाफुलांची तोरणे बांधून देशभक्तीपर गीत वाजविण्यात आले. बुधवारी वर्षभर १०० टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली. एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली.
तालुक्यात इयत्ता १ ली ते ८ वी मराठी माध्यमाचे १ लाख ६१ हजार १४१, सेमी माध्यमाचे १५ हजार ७७८, उर्दू माध्यमाचे ४ हजार ५८५ विद्यार्थी असून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील अनुसूचित जातीच्या १ हजार ३५५, अनुसूचित जमातीच्या २४६ व ७ हजार ९०१ मुलींना तसेच दारिद्य्ररेषेखालील ९९२ विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यासाठी शाळेच्या बँक खात्यावर ४१ लाख ९७ हजार ६०० रुपयांची रक्कम यापूर्वीच जमा करण्यात आल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे यांनी दिली. तालुक्यातील सर्व २३० प्राथमिक शाळेत अद्ययावत पॉलीमर बँचेस बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील वरूर येथील थोरात वस्ती शाळेवर पं. स. सभापती मंगल काटे यांच्या उपस्थितीत तर आव्हाणे बुद्रूक प्रा. शाळेत उपसभापती अंबादास कळमकर, प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. बंकट आर्ले, गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे, केंद्रप्रमुख राजेंद्र बागडे, मुख्याध्यापिका संगिता शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला.
गुलाबपुष्प देऊन स्वागत
अमरापूर : आदर्श विद्या मंदिर विद्यालयात पाचवीत आलेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक भाऊसाहेब खेसमाळस यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. पाचवी ते आठवीमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी पालक अनिल काथवटे होते. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी हजर होते.
जवळेत पुस्तकांचे वाटप
जवळे : जवळे, गुणोरे, सांगवी सूर्या (ता.पारनेर) प्राथमिक शाळा तसेच श्री. धर्मनाथ विद्यालयात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. जवळे शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तके, मुलींना कपड्यांचे मोफत वाटप करण्यात आले. धर्मनाथ विद्यालयात राळेगणथेरपाळचे सरपंच कैलास डोमे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप झाले. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव सालके, प्राचार्य डी.एस.व्यवहारे, संभाजीराव सोमवंशी, ग्रा.पं.सदस्य कानिफनाथ पठारे, गौतम खुपटे, वसंत तोडमल, पालक, कर्मचारी हजर होते.
सुप्यात पाठ्यपुस्तकांचे वाटप
सुपा : सुपा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. प्राचार्य ए. आर. भोर, ज्येष्ठ शिक्षक गंगाधर गाडीलकर, चांगदेव आंधळे, नंदा मगर, मयुरी यादव, सुवर्णा गाडेकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी शहाजापूरचे सरपंच शिंदे, ग्रा. पं. सदस्य बबन गवळी, शिक्षक, कर्मचारी, पालक, हजर होते.