नगरला मनसेत लवकरच नवा गडी नवा राज

By Admin | Updated: June 13, 2014 01:14 IST2014-06-13T00:48:07+5:302014-06-13T01:14:57+5:30

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर मनसेत आता नवा गडी नवा राज येण्याची चिन्हे आहेत़

New Town New Seat Soon In Town | नगरला मनसेत लवकरच नवा गडी नवा राज

नगरला मनसेत लवकरच नवा गडी नवा राज

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर मनसेत आता नवा गडी नवा राज येण्याची चिन्हे आहेत़ अनेक दिवसांपासून रखडलेल्या नगर शहरासह जिल्हा कार्यकारिणी बदलास राज ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखविला असून, आठवडाभरात नव्या कार्यकारिणीची घोषणा केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले़ त्यामुळे प्रमुख पदावर कुणाची वर्णी लागते, याविषयी मनसे कार्यकर्त्यांत कमालीची उत्सुकता आहे़
लोकसभा निवडणुकीत मनसेचा दारूण पराभव झाला़ हा पराभव मनसेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे़ मनसेचे प्रमुख राज ठाकरे स्वत: विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत, तशी घोषणाही त्यांनी केली आहे़ विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी मनसेने सुरू केली आहे़ याचाच एक भाग म्हणून गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत नगरच्या नवीन कार्यकारिणीस ठाकरे यांनी परवानगी दिली़ त्यानुसार नगर शहरासह जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, उपजिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष,अशी नवीन कार्यकारिणी तयार करण्यात येणार आहे़
महापालिका निवडणुकीत मनसेत दोन गट पडले़ एकाच प्रभागातून दोन उमेदवार उभे होते़ यापैकी एक उमेदवार विजयी तर दुसरा पराभूत झाला़ अनेक प्रभागात पाडीपाडीचे राजकारण झाले़ त्यामुळे ही गटबाजी चांगलीच उफाळून आली़ याची दखल घेऊन पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे राजीनामे घेण्यात आले़ मात्र नवीन कार्यकारिणी जाहीर झाली़ त्यात शहरात झालेल्या भाटिया खून प्रकरणाचा तपास रखडल्याचे सांगून जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांच्या बदलीची मागणी करीत एका गटाने उपोषण सुरू केले़ तर दुसऱ्या गटाने भाटिया खून प्रकरणाचा तपास वेळेत लावला, म्हणून शिंदे यांचा सत्कार केला़ यावरून मनसेतील गटबाजी समोर आली़ याप्रकरणाचा अहवाल वरिष्ठांना देण्यात आला होता़ परंतु त्यावर कोणताही निर्णय झाला नाही़ परंतु मुंबईत झालेल्या बैठकीत ठाकरे यांनीच नगरच्या कार्यकारिणीत बदल करण्यास परवानगी दिल्याची माहिती समजली आहे. परंतु कार्यकारिणीत कुणाचा समावेश करण्यात आला, याबाबत गुप्तता पाळण्यात आली. (प्रतिनिधी)
प्रामाणिकपणाचा निकष
नवीन कार्यकारिणी निवडताना प्रामाणिकपणाचाच निकष लावला जाणार आहे़ प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला जाणार असून,योग्य व्यक्तींचीच निवड केली जाण्याची शक्यता आहे़ त्यामुळे अनेकांची अडचण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़
शहराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच
नव्याने जाहीर करण्यात येणाऱ्या कार्यकारिणीत शहराध्यक्ष हे नवीन पद निर्माण करण्यात आले आहे़ या पदासाठी स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले यांच्यासह नगरसेवक गणेश भोसले, सतीश मैड, नितीन भुतारे, मनोज राऊत यांची नावे चर्चेत असल्याचे म्हटले जात आहे़
पक्षनिरीक्षक फडके आज श्रीरामपूरसह अकोला दौऱ्यावर
विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी मनसेने आतापासूनच सुरू केली आहे़पक्ष निरीक्षक सुहास फडके यांच्याकडून राज्यातील आरक्षित मतदारसंघाचा अभ्यास केला जात आहे़ ते शुक्रवारी नगर जिल्ह्यातील आरक्षित श्रीरामपूर व अकोला विधानसभा मतदारसंघात दौरा करणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे़या दौऱ्यात फडके काय रणनिती आखतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़

Web Title: New Town New Seat Soon In Town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.