महापालिकेत युतीचा नवा अध्याय
By Admin | Updated: July 4, 2016 23:51 IST2016-07-04T23:43:56+5:302016-07-04T23:51:03+5:30
अहमदनगर : महापौरपदाच्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध दंड थोपटणाऱ्या शिवसेना-भाजपाचा महापालिकेत नवा राजकीय अध्याय सुरू होत आहे.

महापालिकेत युतीचा नवा अध्याय
अहमदनगर : महापौरपदाच्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध दंड थोपटणाऱ्या शिवसेना-भाजपाचा महापालिकेत नवा राजकीय अध्याय सुरू होत आहे. नवनिर्वाचित महापौर-उपमहापौर एकत्रितपणे गुरुवारी (दि.७) सकाळी ११ वाजता पदभार स्वीकारणार आहेत. या सोहळ््यासाठी पर्यटनमंत्री रामदास कदम, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह शिवसेना-भाजपाचे सर्व गट-तटामधील स्थानिक नेते उपस्थित राहणार आहेत.
महापौर-उपमहापौरपदाची २१ जून रोजी निवडणूक झाली. माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा ३० जून रोजी कालावधी संपला. एक जुलैपासून नव्या महापौर-उपमहापौरांचा कालावधी सुरू झाला. नव्या महापौर सुरेखा कदम यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मातोश्रीवर आशीर्वाद घेतला. त्यानंतर लगेच त्या पदभार घेतील, अशी शक्यता होती. मात्र युतीच्या स्थानिक नेत्यांनी समन्वय ठेवत एकाच दिवशी पदभार घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी युतीच्या मंत्र्यांची तारीख निश्चित करून गुरुवारचा मुहूर्त काढण्यात आला आहे.
या पदभार सोहळ््यास राज्याचे पर्यटन मंत्री रामदास कदम, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, खासदार दिलीप गांधी, माजी आमदार अनिल राठोड, अॅड. अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शीला शिंदे यांच्यासह सेना-भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. महापालिकेत युतीचा धर्म पाळूनच पुढे जायचे आहे, असा संदेश यानिमित्ताने शहरात जाणार आहे. त्यामुळे युतीच्या स्थानिक नेत्यांनी एकत्रित बैठक घेवून वरील निर्णय घेतला आहे. वनमहोत्सवाच्यानिमित्ताने राज्यातही शिवसेना-भाजप एक असल्याचा नारा देण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये महापालिकेच्या माध्यमातून एकीचा नारा दिला जाणार आहे. अंतर्गत विकास कामे आणि राजकारण यावरच युतीची दिशा ठरणार आहे.
(प्रतिनिधी)