अमृत पाणी योजनेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST2021-08-15T04:23:44+5:302021-08-15T04:23:44+5:30
शहराची अमृत पाणी योजना अंतिम टप्प्यात लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन अमृत पाणी पुरवठा ...

अमृत पाणी योजनेचे
शहराची अमृत पाणी योजना अंतिम टप्प्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन अमृत पाणी पुरवठा योजनेत अनेक अडथळे होते. महापालिकेने सातत्याने पाठपुरावा केल्याने ३२ कि. मी. चे काम पूर्ण झाले असून, ही योजना अंतिम टप्प्यात आली आहे. ही योजना महिनाभरात पूर्ण होऊन शहराला ४५ लाख लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.
केंद्र शासनाने अमृत पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली. महापालिकेमार्फत योजनेचे काम सुरू आहे. सन २०१७ मध्ये मुळा धरण येथून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले. जलवाहिनी टाकण्याच्या कामात अनेक अडथळे होते. शेतकऱ्यांनीही सुरुवातीला शेतातून पाइप टाकण्यास विरोध केला होता. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली. तत्कालीन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पाठपुरावा केला. स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनीही पाणी योजनेची पाहणी केली. महापालिकेतील सर्वच पदाधिकाऱ्यांनी पाणी योजनेत येणारे अडथळे दूर करण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. ही योजना ३५ कि.मी.ची आहे. यापैकी ३२ कि.मी. पर्यंत पाइप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३ कि.मी.चे काम पुढील महिनाभरात पूर्ण होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अमृत पाणी योजना पूर्ण करण्यासाठी सन २०१९ पर्यंत ठेकेदाराला मुदत होती; परंतु पाणी योजनेत अनेक अडथळे आले. शेतकऱ्यांनी महापालिकेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे पाणी योजनेत मोठा अडथळा आला; परंतु पदाधिकारी व प्रशासनाने एकत्र येत अडथळ्यांवर मात करत जलवाहिनीचे काम पूर्ण केले असून, विळदघाट येथील जलशुद्धीकरण केंद्राचे कामही अंतिम टप्प्यात आहे. वसंत टेकडी येथील जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. या जलकुंभात ५० लाख लीटर पाणी साठविता येणार आहे. त्यामुळे शहराला पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे.
.....
१०७ कोटींची पाणी योजना
सुमारे १०७ कोटी रुपये खर्चून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढील एक महिन्यात पाणी योजना पूर्ण करण्याचा आदेश ठेकेदाराला देण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला महापालिकेकडून सहकार्य करण्यात येत आहे. मनपा आयुक्त शंकर गोरे प्रत्यक्ष कामाची पाहणी करून अडथळे दूर करत आहेत.
....
नवीन ४ लाख ५० हजार लीटर पाणी मिळणार
अमृत पाणी योजना पूर्ण झाल्यास शहराला ४ लाख ५० हजार लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. सध्या शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. अमृत पाणी योजना पूर्ण झाल्यास शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होऊन सर्वच भागांना समान पाणी देणे शक्य होणार आहे.