राष्ट्रवादीची दहशत
By Admin | Updated: June 22, 2014 00:21 IST2014-06-21T23:42:12+5:302014-06-22T00:21:05+5:30
अहमदनगर : महापालिका आर्थिक नुकसानीत असल्याच्या कारणावरून शहर बस सेवा बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे.

राष्ट्रवादीची दहशत
अहमदनगर : महापालिका आर्थिक नुकसानीत असल्याच्या कारणावरून शहर बस सेवा बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. नफा किंवा तोटा न पाहता सेवा महत्त्वाची आहे. तोटा होत असला तरी अभिकर्ता संस्थेला नुकसान भरपाईची रक्कम दिली पाहिजे. बस सेवा सुरू राहण्याबाबत शिवसेना नगरविकास खात्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार अनिल राठोड यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, मनपात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची दहशत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आल्यापासून अधिकारी पळाले आहेत. आयुक्त, उपायुक्त, नगररचनाकार हे महत्त्वाचे अधिकारी रजा टाकून निघून गेले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या दहशतीला अधिकारी कंटाळले आहेत. शहर बस सेवा बंद पडल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी काय केले. शहर बस सेवा सुरू राहिली पाहिजे अन्यथा सत्ताधाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था सुरू केली पाहिजे. प्रसन्ना आणि महापालिका यांच्यामध्ये झालेला करार हा जनतेसाठी आहे. जनतेला सेवा मिळावी म्हणून करारामध्ये बदल करणे आवश्यक आहे. जुन्या कराराच्या आडून सेवा बंद करणे जनतेच्या अहिताचे आहे. प्रसन्नाने अनेकवेळा महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केले. मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे ही परिस्थिती ओढवली. अभिकर्ता संस्था ब्लॅकमेलिंग करते आहे, असे सांगून सत्ताधारी आपली जबाबदारी झटकत आहेत. जिथे पैसे मिळतात, तेच कामे सत्ताधारी करतात. लोकांना सेवा कोण देणार? प्रसन्नाने दिलेले खर्च तपासणे, हिशेब पाहणे हे प्रशासनाचे काम आहे. तोटा होत असेल तर त्याची भरपाई कशी करायची, हे पाहणे प्रशासनाचे काम आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने जनतेला वेठीस धरले जात आहे. सहा महिन्यांपासून मनपाचा अजुनही अंदाजपत्रक मांडता येत नाही, ही शरमेची बाब आहे. शिवसेनेची सत्ता असताना बस सेवा बंद पडू दिली नाही. शाळा सुरू झाली आणि बस सेवा बंद पडली. यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ यांना पॅगोमधून त्रासदायक प्रवास करावा लागत आहे. शहर बस सेवा बंद पडण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या स्थायीच्या निर्णयाविरोधात सेनेच्या स्थायीच्या सदस्यांनी विरोध केल्याचेही राठोड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कर्मचारी उपाशी...
शहर बस सेवा बंद झाल्यामुळे बस सेवेचे चालक-वाहक अशा दीडशे कर्मचाऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांनी शनिवारी आमदार राठोड यांची भेट घेतली. त्यांची रोजंदारी बुडत आहे. भिंगार, आलमगीर बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. काही बसेस जागेवरच असतात. त्यामुळे तोटा झाला आहे. बसेसवर अनेकवेळा दगडफेक केली गेली. त्याची दुरुस्तीही करावी लागली. बस सेवेच्या फेऱ्या आणि सर्व बस कार्यान्वीत झाल्या तर तोटा भरून निघेल, अशा सूचनाही शहर बस सेवेच्या चालकांनी राठोड यांना सांगितल्या.