राष्ट्रवादी-शिवसेनेत जुंपली

By Admin | Updated: October 16, 2016 00:28 IST2016-10-16T00:28:41+5:302016-10-16T00:28:41+5:30

अहमदनगर : महापालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या उद्घाटनांच्या कामावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

NCP-Joint Chief Minister Shiv Sena | राष्ट्रवादी-शिवसेनेत जुंपली

राष्ट्रवादी-शिवसेनेत जुंपली


अहमदनगर : महापालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या उद्घाटनांच्या कामावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना एका कामाचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. या पार्श्वभूमीवर ‘तुम्ही केलेल्या कामाचे उद्घाटन तुम्हीच करा, त्या विकासकामांचे आम्ही उद्घाटन करून फुकट श्रेय लाटणार नाही’, असा खणखणीत टोला महापौर सुरेखा कदम यांनी आमदारांना लगावला आहे.
मूलभूत सुविधा निधीमधून तत्कालीन महापौर अभिषेक कळमकर यांनी आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ३ मध्ये (पाईपलाईन रोड परिसर) साडेतीन कोटी रुपये खर्चाची कामे मंजूर केली होती. त्यापैकी एकवीरा चौक ते सीटी प्राईड हॉटेल ते जुना पिंपळगाव रोड रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे ६५ लाख रुपये खर्चाचे काम आहे. या कामाचा भूमिपूजन तीन दिवसांपूर्वीच आ. जगताप यांच्या हस्ते झाले. हे काम सत्ताधारी नगरसेविकेच्या पतीने व एका महिला पदाधिकाऱ्याच्या पतीने ठेकेदाराला दमदाटी करून काम बंद पाडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संपत बारस्कर, काँग्रेसचे माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी केला होता. तसेच मूलभूत सुविधा निधीतील कामे युतीच्या सत्ताधाऱ्यांकडून बंद पाडली जात असल्याचा आरोपही या नगरसेवकांनी केला. तसेच बंद पडलेले काम शनिवारी आ. जगताप यांनी पाहणी करून सुरू केले आहे.
या पार्श्वभूमीवर महापौर कदम यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महापालिकेच्या विकासकामांचे उद्घाटन करण्याचा अधिकार महापौरांचा आहे. मात्र तुमच्या काळात केलेल्या कामांचे उद्घाटन तुम्ही केले असेल, तर त्या कामाचे आम्ही पुन्हा उद्घाटन करणार नाहीत.
राष्ट्रवादीच्या काळात महापौरांनी सत्तेवरून पायउतार होत असलेल्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये अनेक कामांची उद्घाटने करण्याची घाई केली. त्या कामांचे आम्ही पुन्हा उद्घाटन करणार नाही. प्रभाग क्रमांक ३ मधील कामाचे आम्ही उद्घाटन केले होते. तेथे पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदावाराचा पराभव झाला, तरीही आपण त्याच प्रभागात विकासकामांचे उद्घाटन करणे हास्यास्पद आहे. आम्ही विकासात राजकारण करणार नाही.
ज्या भागात गरज आहे, त्याच भागात विकासकामे करण्याचा मनोदय कदम यांनी व्यक्त करून राष्ट्रवादीचा समाचार घेतला आहे. मूलभूतच्या कामासाठी महापालिकेचा हिस्सा टाकण्यासाठी निधी नाही. त्यामुळेच या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेला नाही, असे कदम यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: NCP-Joint Chief Minister Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.