लोकमत न्यूज नेटवर्क, खरवंडी कासार (जि. अहिल्यानगर) : अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा गुरुवारी अहिल्यानगर येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार होते. त्यांचा दौराही नियोजित होता. मात्र बीड येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपून मुंडे कुस्तीच्या आखाड्याकडे येण्याऐवजी थेट भगवानगडावर पोहोचले. तेथेच त्यांनी रात्रीचा मुक्काम केला.
मंत्री मुंडे हे बीड येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी गुरुवारी दिवसभर बीड शहरात होते. तेथून ते सायंकाळी अहिल्यानगर येथे येणार होते. शहरातील वाडिया पार्क येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ते हजेरी लावणार होते. त्यासाठी कार्यकर्तेही ताटकळले होते. नियोजन समितीनेही मुंडे यांच्या स्वागताची तयारी केली होती. मात्र त्यांनी आखाड्याऐवजी थेट भगवानगडावरच जाणे पसंत केले. त्यांचा तेथील मुक्कामही नियोजित होता. मात्र त्यांनी आखाड्याकडे पाठ फिरवली. बीडमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर पुरते वादात सापडलेले धनंजय मुंडे यांची भगवानगडावरील भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
श्रीक्षेत्र भगवानगड (ता. पाथर्डी) येथे मंत्री मुंडे यांचे रात्री ८.३० वाजता आगमन झाले. प्रथम त्यांनी संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी गडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचे दर्शन घेतले. तेथेच त्यांच्यासमवेत त्यांची बैठक झाली. मुंडे यांनी शास्त्रींसोबत भोजन केले. त्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या कामाविषयी शास्त्री व मुंडे यांच्यात चर्चा झाली. शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ते भगवानगडावर असतील. सकाळी ते ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिर बांधकामाची पाहणी करतील. त्यानंतर ते भगवानगडावरून मोटारीने परळी वैजनाथ (जि. बीड) कडे प्रयाण करणार आहेत.