एनसीसी छात्रसैनिक करणार १ हजार नागरिकांना योगासाठी प्रेरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:33+5:302021-06-21T04:15:33+5:30
सतरा महाराष्ट्र बटालियनचे प्रमुख कर्नल जीवन झेंडे यांच्या आदेशानुसार व मेजर संजय चौधरी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम होत असल्याची ...

एनसीसी छात्रसैनिक करणार १ हजार नागरिकांना योगासाठी प्रेरित
सतरा महाराष्ट्र बटालियनचे प्रमुख कर्नल जीवन झेंडे यांच्या आदेशानुसार व मेजर संजय चौधरी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम होत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी दिली.
कोरोनाचे सर्व नियम पाळून आपापल्या घरी २१ जून रोजी एकाच वेळी सकाळी सहा ते साडेसहा या वेळेमध्ये छात्र सैनिकांनी स्वतः योगा करावा, तसेच ओळखीच्या लोकांना प्रेरित करावे, असा हा उपक्रम आहे. एनसीसीतर्फे १० जून २०१९ पासून सातत्याने ऑनलाईन प्रशिक्षण छात्र सैनिकांना देऊन त्याचा विशेष सराव केला जात आहे. ताडासन, कपालभाती, प्राणायाम, ध्यानस्थिती, वृक्षासन, पाद हस्त आसन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, वज्रासन, भुजंगासन, शवासन, शांतीपाठ यासारख्या व इतर योगासनांचा अभ्यास छात्रसैनिकांनी करावा, असे मेजर संजय चौधरी यांनी सूचित केले आहे.
योगासन हे दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत आवश्यक असून त्यामुळे शारीरिक व मानसिक क्षमतेमध्ये वाढ होते. म्हणून छात्रसैनिकांनी दररोज नियमित योगासन करून शरीर मानसिक व शारीरिक सुदृढ करण्याचा प्रयत्न करावा, असे मत सतरा महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे यांनी व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून व्यक्त केले. कर्नल विनय बाली, ॲडम ऑफिसर यांनी छात्र सैनिकांना योगासन करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती दिली. बटालियन सुभेदार मेजर लोकेंद्र सिंग यांनी छात्र सैनिकांचे विशेष कौतुक केले. या उपक्रमामध्ये १७ महाराष्ट्र बटालियनचे १७०० छात्र सैनिक व ३२ एनसीसी अधिकारी, दोन आर्मी अधिकारी, १५ नॉनकमिशन व पाच ज्युनिअर कमिशन अधिकारी तसेच १० इतर स्टाफ सहभागी झालेला असून योगासनाविषयी व्हाॅट्सॲप, फेसबुकवरही माहिती सांगितली जाणार आहे.
--------
फोटो - २०एनसीसी १,२