नवरात्रौत्सवाची धूम
By Admin | Updated: September 27, 2014 23:07 IST2014-09-27T22:59:56+5:302014-09-27T23:07:41+5:30
पारनेर : तालुक्यातील निघोज, देवीभोयरे, करंदी, चिंचोली, पारनेर, वडगाव दर्या, गोरेगावसह अनेक गावांमधील देवी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होत आहे.

नवरात्रौत्सवाची धूम
पारनेर : तालुक्यातील निघोज, देवीभोयरे, करंदी, चिंचोली, पारनेर, वडगाव दर्या, गोरेगावसह अनेक गावांमधील देवी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होत आहे. सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची जोड असल्याने सर्वत्र नवरात्रौत्सवाची धूम आहे.
पारनेर तालुक्यात निघोज, करंदी, चिंचोली येथे मळगंगा मातेचीे मंदिरे आहेत. तर देवीभोयरे, गोरेगाव येथे अंबिका मातेचे मंदिर आहे. वडगाव दर्या येथील दर्याबाई, राळेगणसिध्दी येथील पद्मावती देवी, जवळे येथील भवानी माता, पारनेरमधील तुळजामाता, वरखेडमळ्यातील वरखेड माता, ढवळपुरी येथील दुर्गादेवी, अळकुटी, कान्हूररपठार येथील मळगंगा देवी अशी मंदिरे प्रसिध्द आहेत.
जगप्रसिध्द रांजणखळगे असणारे निघोज येथील मळगंगा मंदिर ते कुंडावरील मंदिरापर्यंत रोज चार कि.मी. पायी दिंडी सध्या सुरू आहे. सकाळीच भाविक दिंडीला हजेरी लावतात. ‘मळगंगा माता की जय’ च्या जयघोषाने परिसर दुमदुमुन जात आहे. गावात रोज रात्री समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन होते. या सोहळ्याला हजारो भाविक हजेरी लावतात.
देवीभोयरे येथील अंबिका माता मंदिरात रोज महाआरती व धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. ग्रामस्थांच्यावतीने राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा असून राज्यभरातून आलेल्या नाट्य संघांच्या दर्जेदार नाटकांची मेजवानी रसिकांना मिळत आहे. वडगाव दर्या पाण्याच्या क्षारापासून तयार झालेल्या लवणस्तंभामुळे जागतिक स्तरावर प्रसिध्द आहे. येथील दर्याबाई मंदिरात नवरात्र महोत्सव सुरू आहे. येथेही सध्या राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत आहेत. पारनेर शहरात तुळजामाता मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, विनोदी नाटके या कार्यक्रमांची मेजवानी भैरवनाथ मंदिर परिसरातील जागेत आयोजि केली आहे.
सेनापती बापट चौकातील दुर्गामाता मित्र मंडळाच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रोज महाआरतीचे नियोजन करण्यात आले आहे. चिंचोली येथील मळगंगा मंदिरात ग्रामस्थांच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
तसेच राळेगणसिध्दी येथील पद्मावती मंदिर, म्हसणे फाटा येथील मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
(तालुका प्रतिनिधी)
करंदी गावाचा उपवास
करंदी येथे मळगंगा देवीचे मंदिर आहे. गावाचे हे ग्रामदैवत असल्याने नवरात्रौत्सवात ग्रामस्थ उपवास धरतात. अनेकजण मंदिरातच एकत्र येतात. व नऊ दिवस घरी जात नाहीत. अनेक व्रत ते पाळतात.