निसर्ग खुलला; कोरोनामुळे डोंगरगणला पर्यटकांनी फिरविली पाठ;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 13:39 IST2020-07-19T13:38:03+5:302020-07-19T13:39:06+5:30
डोंगरगण येथील आनंद दरी येथील वातावरण पर्यटकांना खुणावू लागले होते. पर्यटकांचा ओढा सुरू झाला न झाला तोच डोंगरगण परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने येथील पर्यटनावर विपरित परिणाम झाला आहे.

निसर्ग खुलला; कोरोनामुळे डोंगरगणला पर्यटकांनी फिरविली पाठ;
खासेराव साबळे ।
पिंपळगाव माळवी : यंदा वेळेवर पाऊस झाल्यामुळे नगर शहरापासून अवघ्या सोळा किलोमीटर अंतरावरील डोंगरगण येथील आनंद दरी येथील वातावरण पर्यटकांना खुणावू लागले होते. पर्यटकांचा ओढा सुरू झाला न झाला तोच डोंगरगण परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने येथील पर्यटनावर विपरित परिणाम झाला आहे.
डोंगरगण येथे निसर्गरम्य दरी आहे. पूर्वीच्या काळी पापविनाशीनी म्हणून ओळखल्या जाणाºया स्थानास इंग्रजांनी दिलेल्या ‘हॅप्पी व्हॅली’ या नावाची सार्थ नोंद अहमदनगर गॅझिटिअरमध्ये आहे. येथील नंदी, नारदाची ओळख असलेले शिवालय हे गर्भगिरीतील एक महत्त्वाचे स्थान आहे. पावसाळ्यात लहान-मोठ्या डोंगर टेकड्यांवरून कोसळणारे प्रपात, डोंगरातील कडे कपारी, जागो जागी जलकुंड अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण दरी पाहण्यासाठी पर्यटक श्रावण महिन्यात येथे भेट देतात. या पर्यटकांच्या माध्यमातून रामेश्वर देवस्थान येथील ग्रामस्थ, छोटे-मोठे व्यावसायिक व ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळते. परंतु, यावर्षी कोरोनामुळे येथील सर्वांनाच फटका बसला आहे.
यावर्षी वेळेवर पाऊस झाल्यामुळे डोंगरगण येथील वातावरण खूपच निसर्ग सौंदर्याने नटले आहे. परंतु, कोरोना प्रादुर्भावामुळे नाईलाजास्तव येथे पर्यटकांना बंदी घालावी लागत आहे. त्याचा आम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे, असे डोंगरगणचे सरपंच कैलास पटारे यांनी सांगितले.