महापौरांच्या प्रभागातच राष्ट्रवादीत फूट?
By Admin | Updated: May 26, 2016 23:56 IST2016-05-26T23:52:04+5:302016-05-26T23:56:39+5:30
अहमदनगर : जूनमध्ये होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या नगरसेविका पुत्राने महापौर अभिषेक कळमकर यांच्या स्वीय सहायकाला लाचेच्या जाळ्यात अडकवून राष्ट्रवादीला जोरदार झटका दिला

महापौरांच्या प्रभागातच राष्ट्रवादीत फूट?
अहमदनगर : जूनमध्ये होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या नगरसेविका पुत्राने महापौर अभिषेक कळमकर यांच्या स्वीय सहायकाला लाचेच्या जाळ्यात अडकवून राष्ट्रवादीला जोरदार झटका दिला आहे. महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती कलावती शेळके या महापौर कळमकर यांच्या बरोबरीने प्रभागात राष्ट्रवादीकडून विजयी झाल्या आहेत. शेळके यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीतच महापौरांच्या प्रभागात फूट पडल्याचे चित्र राजकीय वर्तुळात निर्माण झाले आहे. शेळके यांची युतीशी वाढलेली जवळीक हे त्यामागील प्रमुख कारण असल्याची चर्चा आहे.
सावेडीतील प्रभाग-१२ या एकाच प्रभागामधून अभिषेक कळमकर व कलावती शेळके हे दोघे राष्ट्रवादीचे नगरसेवक विजयी झाले होते. शेळके यांना महिला व बालकल्याण समितीचे उपसभापतीपद मिळाले. आमदार झाल्यानंतर संग्राम जगताप यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला आणि कळमकर महापौर झाले. कळमकर उमेदवार असलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीतच शेळके नाराज होते. हट्टाला अडून बसल्याने शेळके यांना राजी करताना राष्ट्रवादी नेत्यांच्या नाकी दम आला होता. कसेबसे शेळके यांना सोबत घेत राष्ट्रवादीने महापौर पदाच्या निवडणुकीत बाजी मारली. मात्र तेव्हापासूनच कळमकर-शेळके यांच्यात दुरावा निर्माण झाला. शेळके व कळमकर या दोघांचा प्रभाग एकच असला तरी विकास कामे करण्याचे प्रस्ताव जो तो आपापल्यापरीने देतो. कलावती शेळके यांचे चिरंजीव काका शेळके हेच प्रभागातील समस्या सोडविण्यापासून ते विकास कामांचे प्रस्ताव तयार करणे व त्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याचे काम करतात. काका शेळके अनेकदा महापालिकेत येतात, मात्र महापौर कळमकर यांच्याशी त्यांचा अबोला असतो. महापौर कक्षात प्रवेश न करता स्वीय सहायकाच्या कक्षातूनच ते काढता पाय घेतात. प्रभागातीलच एक काम करण्यासाठी शेळके यांची चोहोबाजुंनी कोंडी करण्यात आली होती. कळमकर यांच्याशी असलेला दुरावा हे त्यामागील कारण होते.शेळके यांनी कळमकर यांच्या स्वीय सहायकाला लाचेच्या जाळ्यात अडकवून आपली नाराजी उघडपणे दाखवून दिली. तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करून काका शेळके यांनी सेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह पदाधिकाऱ्यांना प्रभागात निमंत्रित करून शेळके यांनी सेनेशी जवळीक वाढविली होती.
(प्रतिनिधी)