आदिवासी रक्षणासाठी नॅशनल मोबाइल मेडिकल युनिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:51+5:302021-06-09T04:26:51+5:30
अकोले ग्रामीण रुग्णालय आवारात आ. डाॅ. किरण लहामटे यांच्या हस्ते नॅशनल मोबाइल मेडिकल युनिट या आरोग्य सुविधेचा प्रारंभ झाला. ...

आदिवासी रक्षणासाठी नॅशनल मोबाइल मेडिकल युनिट
अकोले ग्रामीण रुग्णालय आवारात आ. डाॅ. किरण लहामटे यांच्या हस्ते नॅशनल मोबाइल मेडिकल युनिट या आरोग्य सुविधेचा प्रारंभ झाला. राज्यातील १८ जिल्ह्यांत फिरती रुग्णालये सुरू झाली आहेत. अहमदनगर जिल्ह्यासाठी एक मोबाइल वाहन रुग्णालय दिले असून त्याचा सर्वाधिक लाभ अकोले तालुक्यातील आदिवासी भागाला होणार आहे. मोफत आरोग्य सेवा, बालकांची आरोग्य तपासणी, गरोदर माता व स्तनदा माता तपासणी, पॅथाॅलाॅजीकल चाचण्या, आरोग्यविषयक समुपदेशन, नियमित लसीकरण, साथजन्य परिस्थितीत तात्काळ उपचार, मोफत औषधे वाटप अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, परिचर, पॅथाॅलाॅजिस्ट, औषधनिर्माता, समुपदेशक असे सात जण या पथकात असणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीत गरोदर माता बाळांतपण सुविधादेखील या मोबाइल रुग्णालयात आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, सुरेश खांडगे, संपत नाईकवाडी, चंद्रभान नवले, स्वाती नाईकवाडी, प्रभात चौधरी, अक्षय आभाळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. संजय घोगरे, डाॅ. बाळासाहेब मेहेत्रे, समुपदेशक आकाश भागवत आदी उपस्थित होते. यावेळी आमदार यांनी ग्रामीण रुग्णालय आवारात सुरू असलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली.
............
जेथे काहीच आरोग्य सुविधा नाहीत अशा दुर्गम डोंगराळ आदिवासी भागात मोबाइल मेडिकल युनिटचा लाभ होणार आहे. सरकारची आदिवासी भागासाठी ही पथदर्शी योजना ठरणार आहे. साथरोग व बालकांचे आरोग्य यासाठी हे पथक फार उपयोगी ठरणार आहे.
-डाॅ. किरण लहामटे, आमदार
फोटो - ०८ अकोले