राष्ट्रीय स्पर्धेत नगरचा झेंडा
By Admin | Updated: December 17, 2015 23:41 IST2015-12-17T23:31:33+5:302015-12-17T23:41:17+5:30
अहमदनगर : उत्तरप्रदेशमधील लखनौ येथे झालेल्या ‘क्लासिकल व्हॉईस आॅफ इंडिया’ या राष्ट्रीय गायन स्पर्धेत नगरच्या अंजली अंगद गायकवाड हिने प्रथम क्रमांक पटकाविला़

राष्ट्रीय स्पर्धेत नगरचा झेंडा
अहमदनगर : उत्तरप्रदेशमधील लखनौ येथे झालेल्या ‘क्लासिकल व्हॉईस आॅफ इंडिया’ या राष्ट्रीय गायन स्पर्धेत नगरच्या अंजली अंगद गायकवाड हिने प्रथम क्रमांक पटकाविला़ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला.
लखनौ येथे दरवर्षी राष्ट्रीय गायन स्पर्धेचे आयोजन केले जाते. १० व ११ डिसेंबरला झालेल्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून तीन स्पर्धकांची निवड झाली होती. त्यामध्ये दहा वर्षाच्या अंजलीचा समावेश होता. तिने भुपाली रागातील ख्याल सादर केला. तबला व तानपुरा एवढ्याच साथसंगतीवर तिने गानकला सादर केली. संपूर्ण देशभरातून विविध राज्यातील २६ स्पर्धक निवडले होते. ९ ते १४ वर्षे वयोगटातील ज्युनिअर ग्रुपमध्ये अंजली ही सर्वांत लहान स्पर्धक होती. स्टेट बँक क्लासिकल व्हॉईस आॅफ महाराष्ट्रा हे १५ हजार रुपयांचे रोख पारितोषिकही अंजलीनेच पटकाविले होते. तिची मोठी बहीण नंदिनी हिला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकाचे विजेते अंजली (ज्युनिअर ग्रुप) व ओम बोंगाणे (मुंबई-सिनिअर ग्रुप) यांच्या गायनाने मुख्यमंत्रीही प्रभावीत झाले. दोन्ही भगिनींना अंगद गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल त्यांचे ज्येष्ठ संगीततज्ज्ञ डॉ. देविप्रसाद खरवंडीकर, डॉ. मधुसूदन बोपर्डीकर, रघुनाथ केसकर, ज्ञानेश्वर दुधाडे, पवन नाईक यांनी कौतुक केले.