नाशिक - पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST2021-07-17T04:17:26+5:302021-07-17T04:17:26+5:30

सिन्नर ते खेड असे चौपदीकरण झाल्याने डोंगर फोडून धोकादायक वळणे काढण्यात आली. त्यासाठी सुरुंगाचा वापर करण्यात आल्याने डोंगरांना तडे ...

Nashik-Pune highway collapsed in Chandanapuri ghat | नाशिक - पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात दरड कोसळली

नाशिक - पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात दरड कोसळली

सिन्नर ते खेड असे चौपदीकरण झाल्याने डोंगर फोडून धोकादायक वळणे काढण्यात आली. त्यासाठी सुरुंगाचा वापर करण्यात आल्याने डोंगरांना तडे गेले आहेत. त्यात पावसाळ्यात पावसाचे पाणी झिरपते. त्यामुळे अनेक छोटे-मोठे दगड सुटे होतात. संगमनेर तालुक्यात गुरुवारी झालेल्या जोरदार पावसाने शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास छोटे-छोटे दगड नाशिक - पुणे लेनवर पडले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. याबाबत माहिती समजताच डोळासणे पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अरविंद गिरी यांनी दगड महामार्गाच्या बाजूला केले. हिवरगाव टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता साफ केला. वाहतूक सुरळीत करण्यात आली.

...........

दोन वर्षांपूर्वी मार्ग झाला होता बंद

दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात येथील सुरक्षा जाळ्या तुटून मोठे मोठे दगड महामार्गावर येऊन पडल्याने नाशिककडे जाणारा रस्ता बंद झाला होता. ही वाहतूक इतर ठिकाणाहून वळविण्यात आली होती. त्यावेळी आठवड्यात तीन वेळा दरड कोसळली होती. लाखो रुपये खर्चून सुरक्षा जाळ्या बसवण्यात आल्या. तरीही दरडी कोसळत असल्याने घाट परिसरातून प्रवास करताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.

....................

चंदनापुरी घाटात यापूर्वीही दरड कोसळली होती. यंदा पाऊस सुरू होताच छोटे छोटे दगड रस्त्यावर आले. सुदैवाने कोणतेही वाहन तेथून जात नव्हते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महामार्ग प्रशासनाने दरवर्षी प्रतिबंधक उपाय करणे गरजेचे आहे. तसेच महामार्गावर अनेक खड्डे पडले आहेत. उपरस्त्यांची कामे बाकी आहेत. ही सर्व कामे तात्काळ निकाली लावावीत.

-अजय फटांगरे, काँग्रेस गटनेते, अहमदनगर

Web Title: Nashik-Pune highway collapsed in Chandanapuri ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.