पश्चिमेकडील पाणी वळविण्यासाठी नरेंद्र मोदी यांना साकडे घालणार
By Admin | Updated: May 20, 2016 00:26 IST2016-05-20T00:25:40+5:302016-05-20T00:26:29+5:30
लोणी : गोदावरी व तुटीच्या खोऱ्यात पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी वळविण्याबाबत महाराष्ट्र पाणी परिषदेचा प्रस्ताव घेऊन आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे,

पश्चिमेकडील पाणी वळविण्यासाठी नरेंद्र मोदी यांना साकडे घालणार
लोणी : गोदावरी व तुटीच्या खोऱ्यात पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी वळविण्याबाबत महाराष्ट्र पाणी परिषदेचा प्रस्ताव घेऊन आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी केले.
लोणी येथे सुरू असलेल्या पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ते बोलत होते. विखे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना यापुढे कालवा- ओढ्याद्वारे पाणी पुरवठा करण्याऐवजी पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी तो प्रचंड खर्चिक आहे. राज्याकडे तेवढा पैसा नाही. त्यामुळे हे काम सरकार करण्याची शक्यता नाही. एवढा भीषण दुष्काळ आजपर्यंत शेतकऱ्यांनी पाहिला नव्हता. आज जर पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील असते तर त्यांनी पाण्यासाठी मोठे लोकआंदोलन उभे केले असते. महाराष्ट्र पाणी परिषदेने सुचविलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी करून गोदावरी व तुटीच्या खोऱ्यात पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी वळवावे, असा आग्रह पंतप्रधान यांना करणार आहे. त्यासाठी त्यांची लवकरच भेट घेणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या आंदोलनातून शासनाला निर्णय घेण्यास अनेकदा भाग पाडले आहे. म्हणूनच पाण्यासाठी अण्णांनी जनआंदोलन उभारावे. यासाठी पाणी परिषदेचे पदाधिकारी अण्णांचीही भेट घेतील. या आंदोलनातून सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होईल.
शेतकरी हा वारकरी आहे म्हणूनच वारकरी संप्रदाय या जनआंदोलनामध्ये सहभागी होईल, असे वरदविनायक सेवाधामचे मठाधिपती उद्धव महाराज नेवासेकर यांनी सांगितले. तरुणांनी सध्या सुरू असलेल्या जलक्रांती अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.(प्रतिनिधी)