पदाधिकाऱ्यांच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब
By Admin | Updated: September 19, 2014 23:39 IST2014-09-19T23:23:13+5:302014-09-19T23:39:23+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष सभापतींच्या नावावर शनिवारी शिक्कामोर्तब होणार आहे़

पदाधिकाऱ्यांच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवड होत असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि समिती सभापतींच्या नावावर शनिवारी (दि़२०) शिक्का मोर्तब होणार आहे़ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र बैठक होवून आपल्या वाट्याला येणाऱ्या पदासाठी नावे निश्चित करण्यात येणार आहेत़
काँग्रेसची शनिवारी सायंकाळी सहा वाजता शहरातील तुषार गार्डन येथे बैठक होणार आहे़ पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत़ तर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक रात्री आठ वाजता हुंडेकरी लॉन येथे होत आहे़ या बैठकीला पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, शंकरराव कोल्हे, विद्यमान आमदारांसह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत़
दोन्ही काँग्रेसच्या बैठकांमध्ये सर्व सदस्यांशी चर्चा करून पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात येणार आहेत़ शालिनीताई विखे अध्यक्ष असताना जिल्हा परिषदेत पद वाटणीचा जो तोडगा निघाला होता तोच यावेळीही कायम करण्यात येणार असल्याचे समजते़ राष्ट्रवादीचे जास्त संख्याबळ असल्याने अध्यक्षपदासह बांधकाम व समाजकल्याण समिती त्यांच्याकडे राहिल तर काँग्रेसकडे उपाध्यक्षपदासह कृषी आणि महिला व बालकल्याण समिती राहणार आहे़ उद्या सायंकाळी दोन्ही काँग्रेसची स्वतंत्र बैठक झाल्यानंतर शनिवारी रात्री उशीरा किंवा रविवारी सकाळी मंत्री व ज्येष्ठ नेत्यांची पुन्हा बैठक होवून पदाधिकारी पदासाठी नावे निश्चित करण्यात येणार आहेत़ नंतर ही नावे मित्रपक्षांना कळविण्यात येणार आहेत़ शनिवारी होणाऱ्या बैठकीसाठी राष्टवादी काँग्रेसने सर्व सदस्यांना निमंत्रण दिले आहे़ मात्र, राष्ट्रवादीला रामराम करून भाजपावासी झालेले बबनराव पाचपुते यांच्या पत्नी जि़प़ सदस्या प्रतिभाताई पाचपुते या बैठकीला उपस्थित राहणार की, नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़ (प्रतिनिधी)