अहमदनगर : महापालिका आयुक्त पदासाठी अजय चारठणकर, महेश डोईफोडे आणि स्मिता झगडे यांच्या नावाची चर्चा आहे. अजय चारठणकर यांना आयुक्त म्हणून आणण्यासाठी आमदार संग्राम जगताप आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महापालिकेच्या आयुक्तपदी कुणाची वर्णी लागते, याची उत्सुकता आहे.
महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार हे गुरुवारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे आयुक्त पद रिक्त आहे. आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महापालिकेला नवीन आयुक्त मिळावा, यासाठी शहराचे आमदार जगताप यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचे समजते. नगरविकास राज्यमंत्री प्रजाक्त तनपुरे हे नगर जिल्ह्यातीलच आहेत. त्यांच्यामार्फत नवीन आयुक्त पदाची मागणी केली होऊ शकते. आमदार संग्राम जगताप यांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही सलोख्याचे संबंध आहेत, तसेच जगताप हे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शिफारस करू शकतात. अजय चारठणकर यांनी उपायुक्त म्हणून नगरमहापालिकेत काम केलेले आहे. त्यांना शहराची माहिती असून, येथील कामाचा अनुभव आहे. यामुळे ते चारठणकर यांच्यासाठी अग्रही असल्याचे बोलले जाते. महेश डोईफोडे यांनीही उपायुक्त म्हणून नगरमहापालिकेत काम केलेले आहे. डोईफोडे हे मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून डोईफोडे यांचे नाव सुचविले जाऊ शकते. जगताप व मुंढे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. उपायुक्त स्मिता झगडे या पदोन्नतीस पात्र आहेत. त्यामुळे पदोन्नतीने झगडे नगरमध्ये आयुक्त म्हणून येऊ शकतात. उपायुक्त झगडे यांनीही नगर महापालिकेत उपायुक्त म्हणून काम केलेले आहे.