नगरकरांनी जाणून घेतले लष्करी सामर्थ्य
By Admin | Updated: August 17, 2016 00:46 IST2016-08-17T00:34:46+5:302016-08-17T00:46:36+5:30
अहमदनगर : सहा ते नऊ किलोमीटर फायर रेंज क्षमता असणारे अवाढव्य रणगाडे, वेगवेगळी क्षेपणास्त्रे, अत्याधुनिक बंदुका आदी लष्करी शस्त्रास्त्रे प्रत्यक्षात पाहून नगरकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

नगरकरांनी जाणून घेतले लष्करी सामर्थ्य
अहमदनगर : सहा ते नऊ किलोमीटर फायर रेंज क्षमता असणारे अवाढव्य रणगाडे, वेगवेगळी क्षेपणास्त्रे, अत्याधुनिक बंदुका आदी लष्करी शस्त्रास्त्रे प्रत्यक्षात पाहून नगरकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
स्वातंत्र्यदिनी नगर-सोलापूर रस्त्यावरील फराहबाग येथे रणगाडा संग्रहालयात एसीसी अॅण्ड एस व एमआयआरसी या लष्करी प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ‘जाणून घ्या आपल्या सैन्याला’ हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सैन्य शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. रणगाडा संग्रहालयातील वैशिष्ट्यपूर्ण व जगभरातील युद्धात सहभागी रणगाड्यांची माहिती सैनिकांनी नगरकरांना दिली.
सुटीचा दिवस असल्याने हजारो नागरिक या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आले होते. सध्या लष्करी ताफ्यातील बलशाली रणगाडे, अत्याधुनिक बंदुका, क्षेपणास्त्रे, लाँचर, तसेच लष्करी विभागाबाबत सामान्य लोकांना असलेल्या शंकांचे निरसन सैनिकांनी केले.
चित्रपट किंवा छायाचित्रात पाहिलेली ही शस्त्रास्त्रे प्रत्यक्षात पाहिल्याने अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. लहान मुलांनी प्रत्यक्ष रणगाड्यात बसण्याची हौस पूर्ण करून घेतली. अनेकांनी देशाची शान असलेल्या सैनिकांबरोबर छायाचित्रे काढली. जवळच असलेल्या फराहबक्ष जलमहालालाही अनेकांनी भेट दिली.
(प्रतिनिधी)