पसंती क्रमांकासाठी नगरकरांनी मोजले अडीच कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:46 IST2020-12-17T04:46:11+5:302020-12-17T04:46:11+5:30
अहमदनगर : वाहनांना पसंती क्रमांक घेण्यासाठी हौशी नगरकरांनी गेल्या दोन वर्षांत येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तब्बल २ कोटी ६७ ...

पसंती क्रमांकासाठी नगरकरांनी मोजले अडीच कोटी
अहमदनगर : वाहनांना पसंती क्रमांक घेण्यासाठी हौशी नगरकरांनी गेल्या दोन वर्षांत येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तब्बल २ कोटी ६७ लाख रुपये माेजले आहेत. ३ ते ५० हजार रुपयांचे शुल्क भरून वाहनचालकांनी हे फॅन्सी नंबर घेतले आहेत. ९, ९९, ९९९, ९००९ या क्रमांक मालिकेला तर दरवर्षी मोठी मागणी आहे.
नवीन वाहनासाठी मनाप्रमाणे क्रमांक मिळावा, यासाठी बहुतांशी वाहनमालक प्रयत्न करतात. काही जणांची तर कितीही पैसे खर्च करण्याची तयारी असते. लकी क्रमांक, जन्मतारीख, ज्या क्रमांकामधून नावे तयार होतात. असे फॅन्सी क्रमांक मिळविण्यासाठी वाहनधारकांची धडपड पाहावयास मिळते. या पसंती क्रमांकाचे शुल्क शासनाकडूनच निश्चित केलेले असते. पसंती क्रमांकाच्या खरेदीतून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून शासनाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. २०१९ या वर्षात १ हजार ९७३ वाहनधारकांनी १ कोटी ६१ लाख १९ हजार रुपयांचे शुल्क भरून पसंती क्रमांक घेतला, तर २०२० या वर्षात नोव्हेंबरअखेर १ हजार ११७ वाहनधारकांनी १ कोटी ५ लाख ८२ हजार रुपये भरून पसंती क्रमांक घेतला.
भाऊ, दादाची क्रेझ
पसंती क्रमांकाच्या माध्यमातून भाऊ, दादा, काका, आई ही नावे तयार केली जातात. ४१४१ या क्रमांकातून दादा, ९७१३ या क्रमांकातून भाऊ, तर ३७१५ या क्रमांकातून आई हे नाव तयार केले जाते. त्यामुळे शुल्क भरून हौशी वाहनधारक हे क्रमांक घेतात. यामध्येही भाऊ आणि दादा यांची क्रेझ तर नगर जिल्ह्यात मोठी आहे.
सर्वाधिक पसंती या नंबर्सना
१, १६, ०००२, ३०० या क्रमांकाला वाहनधारकांकडून सर्वाधिक पसंती मिळते. १ हा क्रमांक घेण्यासाठी ५० हजार रुपये शुल्क आहे. एखाद्या क्रमांकाला एकापेक्षा जास्त जणांनी मागणी केलेली असेल, तर ज्याने जास्त पैशांचा धनादेश दिलेला आहे त्याला तो क्रमांक दिला जातो. ज्या वाहनधारकांचे बजेट कमी असते, त्यांच्यासाठी ३ ते पाच हजार रुपयांपर्यंतही पसंती क्रमांकाची मालिका उपलब्ध आहे.
आरटीओला मिळालेला महसूल
२०१९- १ कोटी ६१ लाख १९ हजार
२०२०- १ कोटी ५ लाख ८२ हजार
दुचाकी व चारचाकी संवर्गातील नवीन सिरीजमध्ये गणले जाणारे पसंती क्रमांक वाहनधारकांसाठी उपलब्ध असतात. वाहनचालक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नियमाप्रमाणे शुल्क भरून पसंती क्रमांक घेऊ शकतात. क्रमांक मिळविताना वाहनधारकांना अडचणी येऊ नयेत यासाठी आधीच प्रसिद्धीपत्रक काढले जाते. त्यात सर्व प्रक्रिया समजावून सांगितली जाते, तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनही मार्गदर्शन केले जाते.
-दीपक पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अहमदनगर
फोटो १६ आरटीओ