नागरदेवळे, वडारवाडी, केतकी ग्रामपंचायतींची मिळून होणार नगरपालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:17+5:302021-06-21T04:15:17+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील शहरीकरण झालेल्या व नगरपालिकेच्या निकषात बसणाऱ्या नागरदेवळे, वडारवाडी, केतकी-शहापूर या तीन ग्रामपंचायतींची मिळून लवकरच नगरपालिका ...

नागरदेवळे, वडारवाडी, केतकी ग्रामपंचायतींची मिळून होणार नगरपालिका
केडगाव : नगर तालुक्यातील शहरीकरण झालेल्या व नगरपालिकेच्या निकषात बसणाऱ्या नागरदेवळे, वडारवाडी, केतकी-शहापूर या तीन ग्रामपंचायतींची मिळून लवकरच नगरपालिका होणार आहे. या प्रस्तावावर लवकरच अंतिम निर्णय होणार असून आता ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे धोरणही बदलणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
नगर तालुक्यातील पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, नगर शहरालगतचा भाग असूनही आणि बऱ्यापैकी शहरीकरण झालेले असतानाही नागरदेवळे, वडारवाडी, केतकी-शहापूर या भागांचा विकास झालेला नाही. ग्रामपंचायत असल्याने येथे विकासात्मक योजना राबविण्यात मर्यादा येतात. यामुळे या तीनही ग्रामपंचायतींचे नगरपालिकेत रूपांतर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच यावर अंतिम निर्णय होईल. शासनस्तरावरून माहिती संकलित करण्याची कार्यवाही सुरू आहे. नगरपालिका झाल्यानंतर या भागाचा कायापालट होईल, असे त्यांनी सांगितले.
तनपुरे म्हणाले, ग्रामीण पाणीपुरवठा योजना सातत्याने अडचणीत येत आहेत. यामुळे या योजनांचे धोरण बदलणार असून तशा सूचना महावितरणला दिल्या आहेत. त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच यात धोरणात्मक बदल होणार आहे. पिंपळगाव माळवी व परिसरातील सात-आठ गावांतील पाणी योजना आता सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहे. त्या योजना आता महावितरणला जोडणार असून त्यासाठी ६० लाखांचा खर्च येणार आहे. यामुळे योजना स्वयंपूर्ण होतील. ग्रामपंचायतींना आर्थिक उत्पन्नही मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.
---
नगर तालुक्यात आता दबाव राहिला नाही..
नगर तालुक्यात पूर्वीसारखा आता कोणाचा दबाव राहिला नाही. गावोगावी जनता दरबार घेतो. त्यावेळी लोक स्वत:हून येतात. तालुक्यात आता विकासाचे राजकारण करणार असून बाजार समिती, पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मागे भक्कमपणे उभा राहणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.