गरजू रूग्णांसाठी नगर तालुका बाजार समिती सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST2021-05-01T04:18:54+5:302021-05-01T04:18:54+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. गोरगरीब रुग्णांना महागडे उपचार, ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर ...

गरजू रूग्णांसाठी नगर तालुका बाजार समिती सरसावली
केडगाव : नगर तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. गोरगरीब रुग्णांना महागडे उपचार, ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर इंजेक्शन, महागडी औषधे परवडत नसल्याने अनेक गरीब रुग्णांची गरज ओळखून बाजार समिती त्यांच्यासाठी सरसावली आहे. सर्व सुविधांसह बाजार समितीने वाळुंजपाठोपाठ मेहकरी येथे कोविड सेंटर सुरू केले असून गरजू रुग्णांना ते वरदान ठरत आहे.
तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १o हजारांच्या घरात चालली आहे. ज्या गावांनी पहिल्या लाटेत कोरोनावर मात केली ती गावेही आता कोरोनाच्या विळख्यात अडकली आहेत. ग्रामीण भागातही कोरोनाने कहर केल्याने तालुक्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुका प्रशासनाच्या पुढाकारातून तालुक्यात चिंचोडी पाटील ग्रामीण रुग्णालयासह ५ ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आले. मात्र, ऑक्सिजन बेड व इतर सोयी सुविधांच्या मर्यादा येत असल्याने तालुक्यातील गोरगरीब रुग्णांची हेळसांड सुरू होती. शहरातील महागडी उपचार पद्धती आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने रुग्ण मोठ्या उसनवारी करून उपचार घेत होते.
दादा पाटील शेळके नगर बाजार समितीने गरजू रुग्णांची हेळसांड पाहून कोविड सेंटर सुरू करून गोरगरीब रुग्णांची होणारी परवड थांबविली आहे. सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले, आ. बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात गरज निर्माण होईल, तेथे तातडीने सर्व सुख-सुविधांसह कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला.
तालुक्यातील गरीब रुग्णांना शहरातील महागडी रुग्णालये परवडणारी नाहीत तसेच ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत. इंजेक्शन मिळत नाही. रुग्णांच्या जेवणाच्या डब्याचा प्रश्न सुटलेला नाही. ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे बाजार समितीने वाळुंज येथे शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. सध्या ४१ रुग्ण तेथे उपचार घेत आहेत. येथे रुग्णाच्या सेवेसाठी पूर्णवेळ दोन डॉक्टर आहेत. राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी चहा, नाश्ता, दोन वेळेचे जेवण दिले जाते. औषधोपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या वाढली तर दोनशे बेडची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. यासाठी बाजार समितीचे सर्व पदाधिकारी सहकार्य करीत आहेत. उपसभापती संतोष म्हस्के यांनी स्वतःच्या मालकीचे रामसत्य मंगल कार्यालय कोरोना रुग्णासाठी सेंटर उभे करण्यास दिले आहे. जोपर्यंत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही, तोपर्यंत मंगल कार्यालयात कोरोना सेंटर चालू राहणार असल्याचे संतोष म्हस्के यांनी सांगितले. मागील वर्षी १११ कुटुंबाना म्हस्के यांनी किराणा दिला होता तसेच स्वस्त धान्य दुकानातून रेशन दिले होते. मेहकरी येथेही कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
पोखर्डी येथेही सेंटर चालू करणार असल्याचे सभापती घिगे यांनी सांगितले. कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनसाठी आ. बबनराव पाचपुते यांनी २० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्याचे ठरविले आहे. यामुळे ऑक्सिजनचा प्रश्नही सुटणार आहे.
--
बाजार समितीने सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. वाळुंज, मेहेकरी येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. जेथे गरज निर्माण होईल, तेथे बाजार समिती कोविड सेंटर सुरू करण्यास तयार आहे.
-अभिलाष घिगे,
सभापती, बाजार समिती, नगर
---
३० वाळुंज बेड
मेहकरी येथे