नगर तालुक्यालाही कोरोनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:20 IST2021-04-02T04:20:11+5:302021-04-02T04:20:11+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील शहराजवळील गावांना कोरोनाचा विळखा पडल्याने ग्रामीण भागात चिंता वाढली आहे. सध्या तालुक्यात कोरोना बाधितांची ...

नगर तालुक्यालाही कोरोनाचा विळखा
केडगाव : नगर तालुक्यातील शहराजवळील गावांना कोरोनाचा विळखा पडल्याने ग्रामीण भागात चिंता वाढली आहे. सध्या तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या २६८ पर्यंत पोहोचली आहे. ९ गावात कंटेनमेंट झोन असून पाच गावे लॉकडाऊन केली आहेत. तीन ठिकाणी कोविड सेंटर आहेत.
तालुक्यातील अकोळनेर, वडगाव गुप्ता, शिंगवे, अरणगाव, नेप्ती, नवनागापूर, खंडाळा, निंबळक, बुऱ्हाणनगर येथे बाधितांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या गावात कंटेनमेंट झोन तयार केले आहेत. बुऱ्हाणनगर, अरणगाव आणि चिचोंडी पाटील येथे कोविड सेंटर असून येथे १२० बेडची क्षमता आहे. बाधितांची संख्या वाढत असल्याने आणखी बेड वाढविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
सध्या शासकीय आकडेवारीपेक्षा चार पट अधिक कोरोनाबाधित असल्याचे गावोगावी दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाबाबतची चिंता वाढली आहे.
मध्यंतरी कोरोनाचा प्रभाव काही प्रमाण कमी झाल्याने ग्रामीण भागात कोरोना सुरक्षितेचे नियमच ग्रामस्थ विसरले होते.
वाळकी, चिचोंडी पाटील, रुईछत्तीसी, जेऊर, निंबळक, देहरे, दरेवाडी, अरणगाव, नागापूर या बाजारपेठेच्या गावांमध्ये सुरक्षा नियमांचे पालन न करता होणारी गर्दी अन् स्थानिक सुरक्षा समितीकडून याकडे होणारे दुर्लक्ष आगामी संकटाला आमंत्रण देत होते. दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागात कोरोना झपाट्याने फैलावला असल्याचे दिसते. गेल्या आठवड्यात शासकीय आकडेवारीपेक्षा कोरोना बाधितांची संख्या अधिक असल्याने अरणगाव, अकोळनेर, नवनागापूर, शिंगवे, वडगाव गुप्ता ही पाच गावांमध्ये लॉकडाऊन केले आहे. अनेक गावांचा शहराशी रोजचा संपर्क आहे. कामानिमित्त, खरेदी, नोकरी, व्यापारासाठी शहराकडे धाव घेत आहेत. त्यातूनच कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात पसरला असल्याचे दिसते.
सध्या दिवसभर उष्णता अन् पहाटे गारवा अशा प्रकारे वातावरणात बदल होत असल्याने अनेकांना सर्दी, खोकला, ताप, हातपाय गळणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. असे लोक तपासणी न करता मेडिकलमधून औषधे खरेदी करत उपचार घेत आहेत. यामुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे जिकिरीचे बनले आहे.
---
सध्या चिंचोडी पाटील येथील सेंटरमध्ये ४ रुग्ण आहेत. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन बेडची संख्या वाढविण्यावर आमचा भर आहे. मात्र आमच्याकडे मनुष्यबळ कमी पडत आहे. एकाच ठिकाणी जास्त बेडची व्यवस्था झाली तर मनुष्यबळाच्या अडचणीवर मात करता येईल.
-डॉ. ज्योती गाडे/मांडगे
तालुका आरोग्य अधिकारी
---
०१ चिचोंडी
चिंचोडी पाटील येथील कोविड सेंटरमध्ये सध्या तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची सोय केली आहे.