अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाइन जाहीर झाला. यात नगर जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के लागला आहे. मागील वर्षीपेक्षा हा निकाल चार टक्क्यांनी जास्त आहे. प्रत्येक निकालात मुलांच्या तुलनेत मुली बाजी मारतात. मात्र या निकालात मुले-मुलींचे उत्तीर्ण प्रमाण जवळपास सारखेच आहे.
यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार गुण दिले गेले आहेत. त्यामुळे वर्ग न भरता व परीक्षा न देता लागलेला हा पहिलाच निकाल ठरला आहे. नगर जिल्ह्यातून मार्च २०२१ या वर्षातील परीक्षेसाठी ४० हजार ५५७ मुले व ३० हजार ३२ मुली अशा एकूण ७० हजार ५८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परंतु कोरोनामुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनानुसार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. यात ४० हजार ५५५ मुले व ३० हजार ३० मुली अशा एकूण ७० हजार ५८५ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले. ते मंडळाकडे सादर केल्यानंतर ४० हजार ५४२ (९९.९६ टक्के) मुले व ३० हजार २४ (९९.९८ टक्के) मुली असे एकूण ७० हजार ५६६ (९९.९७ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षी (मार्च २०२०) नगर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला होता.
---------------
१९ विद्यार्थी अनुत्तीर्ण
यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा न होता अंतर्गत मूल्यमापनातून निकाल जाहीर झाला.
या निकालात नगर जिल्ह्यातून ७० हजार ५८५ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन बोर्डाकडे पाठवले होते. पैकी ७० हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे केवळ १९ विद्यार्थी अनुतीर्ण झाले.
---------------
तालुकानिहाय निकाल
तालुका टक्केवारी
अकोले १००
कोपरगाव १००
नेवासा १००
श्रीगोंदे १००
जामखेड ९९.९५
कर्जत ९९.८८
नगर ९९.९८
पारनेर ९९.९७
पाथर्डी ९९.९५
राहाता ९९.९६
राहुरी ९९.९५
संगमनेर ९९.९५
शेवगाव ९९.९७
श्रीरामपूर ९९.९७
--------------
एकूण ९९.९७ टक्के
----------------
वेबसाईट बंद पडल्याने मुलांचा हिरमोड
शुक्रवारी दुपारी १ वाजता परीक्षा मंडळाने जाहीर केलेल्या वेबसाईटवर ॲानलाइन निकाल मिळणार होता. परंतु एकही साईट चालत नसल्याने दुपारी चारपर्यंत मुलांना निकाल मिळालेला नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचाही हिरमोड झाला. अनेक विद्यार्थी निकालासाठी मित्र, नातेवाइकांना फोन करून माहिती घेत होते.
----------
९७ टक्के रीपिटरही उत्तीर्ण
जिल्ह्यातून २५७२ पुनर्परीक्षार्थींनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यातील २५१६ जण (९७.८२ टक्के) उत्तीर्ण झाले. त्यातील ३१ जण विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. नेहमीपेक्षा पुनर्परीक्षार्थींचे उत्तीर्णचे प्रमाण यंदा जास्त आहे.
-------------