माझी दृष्टी दाखवेल अंधाला सृष्टी

By Admin | Updated: June 6, 2014 01:00 IST2014-06-05T23:40:03+5:302014-06-06T01:00:34+5:30

शिर्डी/सोनई : साईचरणी नानाविध प्रकारचे दान भाविक अर्पण करतात़ साईबाबांची भक्त असलेल्या सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनेही नेत्रदान करण्याचा संकल्प साईदरबारी स्पष्ट केला़

My eyesight will show blind bodies | माझी दृष्टी दाखवेल अंधाला सृष्टी

माझी दृष्टी दाखवेल अंधाला सृष्टी


शिर्डी/सोनई : साईचरणी नानाविध प्रकारचे दान भाविक अर्पण करतात़ साईबाबांची भक्त असलेल्या सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनेही नेत्रदान करण्याचा संकल्प साईदरबारी स्पष्ट केला़सोनई येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानकडे शिल्पा शेट्टीने नेत्रदानाचा अर्ज भरुन दिला़ नेत्रदानामुळे मृत्युनंतरही आपले डोळे हे जग पाहू शकतील आणि एका अंध व्यक्तीला ही सुंदर सृष्टी पाहण्यासाठी दृष्टी मिळेल, अशी भावना शिल्पाने यावेळी व्यक्त केली़
शिल्पा शेट्टी हिने वाढदिवसाच्या दोन दिवस अगोदर गुरुवारी (दि़५) पती राज कुंद्रा व वडील सुरेंद्र शेट्टी यांच्यासमवेत साईदरबारी हजेरी लावून साईबाबांचे दर्शन घेतले़ शिल्पाची धाकटी बहीण शमिता शेट्टी हिने यापूर्वीच मरणोत्तर नेत्रदानासाठी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानकडे नोंदणीही केली आहे़ शिल्पानेही बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत यशवंत प्रतिष्ठानकडे नेत्रदानाचा अर्ज भरला़ त्यानंतर शिल्पा शेट्टी हिने पत्रकारांशी संवाद साधला़ आपले संपूर्ण कुटुंब साईभक्त आहे़ गेल्या बारा वर्षापासून गुरुवारचा उपवास करते, महिन्यापासून शिर्डीला येण्याचा प्रयत्न होता़ गुरुवारी हा योग जुळून आल्याचे सांगत शिल्पा शेट्टी हिने साईबाबांचे आभारही मानले़
संस्थानच्या वतीने कार्यकारी अधिकारी अजय मोरे यांनी शिल्पा व तिच्या कुटुंबाचा सत्कार केला़ शिल्पाला बघण्यासाठी, स्वाक्षरी घेण्यासाठी व तिच्या सोबत फोटो काढण्यासाठी मंदिर परिसरात तिच्या चाहत्यांनी गर्दी केली होती़ शिल्पानेही या चाहत्यांना नाराज केले नाही़(वार्ताहर)


जय पराजय होतच असतो...
राजस्थान रॉयल्स संघाची मालकीण असलेल्या शिल्पाने संघ पराभूत झाल्याचे शल्य व्यक्त करताना क्रिकेटमध्ये जय पराजय होतच असतो़ या मालिकेत राजस्थान संघाने चांगली कामगिरी केली़ मात्र, आम्ही जिंकू शकलो नाही़ मी हे सगळं विसरण्याचा प्रयत्न करत आहे़ त्यामुळे या संदर्भात प्रश्न विचारुन दु:खी करु नका अशी विनंती करत आयपीएलमध्ये काहीही शक्य आहे असे सांगत शिल्पाने या विषयावर अधिक भाष्य करण्याचे टाळले़
देशात नरेंद्र मोदींचे सरकार आल्याचा आनंद आहे़ लगेच सगळं ठिक होईल असे नाही़ त्यांनाही वेळ द्यायला हवा़ मोदी सरकारने महिला सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करावे अशी अपेक्षा शिल्पा शेट्टी हिने शिर्डी येथे व्यक्त केली़
शनिशिंगणापूर येथे शनीमठात राजकुंद्रासह शिल्पाने अभिषेक केल्यानंतर शनिदर्शन घेतले. त्यानंतर देवस्थानचे अध्यक्ष शिवाजी दरंदले यांनी शिल्पा शेट्टीचा सत्कार केला. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या कार्यालयात शिल्पा शेट्टीने नेत्रदानाचा फॉर्म भरला.
प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे तिने कौतूक केले. शिल्पा शेट्टीने फॉर्म भरल्यानंतर बंगलोर येथून आलेल्या १२१ नागरिकांनीही नेत्रदानाचा फॉर्म भरला.
शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी हिने तीन दिवसापूर्वी नेत्रदानाचा फॉर्म भरला होता. शेट्टी कुटुंबिय प्रतिष्ठानबरोबर राहील, असे आश्वासन तिने दिले होते. शिल्पा शेट्टी हिने नेत्रदानाचा फॉर्म भरुन आश्वासन खरे करुन दाखविले आहे.

Web Title: My eyesight will show blind bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.