मोहरी तलाव ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:02+5:302021-09-07T04:26:02+5:30
खर्डा : जामखेड तालुक्यातील मोहरी येथील लघू मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला. त्यामुळे खर्डा परिसराला दिलासा मिळाला ...

मोहरी तलाव ओव्हरफ्लो
खर्डा : जामखेड तालुक्यातील मोहरी येथील लघू मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला. त्यामुळे खर्डा परिसराला दिलासा मिळाला आहे.
गेले दोन-तीन महिने पावसाने हुलकावणी दिली. परंतु, गेले दोन-तीन दिवस मोहरी घाटात जोरदार पावसाने जामखेड तालुक्यातील मोहरी तलाव ओव्हरफ्लो झाला असून सांडव्याहून पाणी वाहू लागले आहे.
दुष्काळजन्य परिस्थितीत संपूर्ण खर्डा शहरासह संपूर्ण तालुक्याला टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी या तलावाचा उपयोग होत असल्याने प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे. खर्डा शहरासह मोहरी, गवळवाडी, गितेवाडी या गावालाही येथूनच पाणीपुरवठा होतो. मागील दोन वर्षांपूर्वी तालुक्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे तालुक्यातील तलावांपैकी केवळ मोहरी येथील तलावातच पाणी शिल्लक होते. या उद्भवावर पाणी भरून तालुक्यात तब्बल ९६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तलावाचे ठिकाण बालाघाटच्या डोंगररांगांच्या कुशीत आहे. त्यामुळे गतवर्षी या भागात बऱ्यापैकी पाऊस झाला होता. तेव्हा तलाव भरला होता.
खर्डा शहरासह मोहरी, गितेवाडी, गवळवाडी, तेलंगशी, जायभायवाडी या गावांनाही पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीलाही सिंचनासाठी पाणीपुरवठा होतो. यामुळे तलावावर अवलंबून असणारे अंदाजे तीनशे ते चारशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांबरोबर वन्यजीव, पशु-पक्षी, पाळीव प्राण्यांना होईल. मोहरी लघू प्रकल्प ६२.५० दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असून कालव्याची लांबी सात किलोमीटर आहे.
---
०६ मोहरी तलाव
जामखेड तालुक्यातील मोहरी तलावाच्या सांडव्याहून वाहणारे पाणी.