मुशायरात रंगले नगरकर

By Admin | Updated: September 1, 2014 00:03 IST2014-08-31T23:53:16+5:302014-09-01T00:03:23+5:30

अहमदनगर : देशातील नामवंत शायरांनी सादर केलेल्या शेरोशायरी, गजल रचनांना वाहवा,बहोत खूब, क्या बात है अशी दाद देत नगरकर रसिकांनी मुशायराचा आनंद लुटला.

Musherat Rangale Nagarkar | मुशायरात रंगले नगरकर

मुशायरात रंगले नगरकर

अहमदनगर : देशातील नामवंत शायरांनी सादर केलेल्या शेरोशायरी, गजल रचनांना वाहवा,बहोत खूब, क्या बात है अशी दाद देत नगरकर रसिकांनी मुशायराचा आनंद लुटला. उत्तररात्रीपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात रसिक रंगून गेले.
गणेशोत्सवानिमित्त नगर व्यासपीठ आयोजित सतराव्या नगर महोत्सवात मुस्लीम बँक यांच्यावतीने आयोजित अखिल भारतीय मुशायरा कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाला.
मान्यवरांची उपस्थिती
व्यासपीठावर पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते मुन्नवर पीरभाई, मनसेचे नेते वसंत लोढा, उद्योजक रामशेठ मेंघाणी, मुस्लीम बँकेचे उपाध्यक्ष सलिम मणियार, सीईओ.जे.एल.मद्रुपकर, व्यवस्थापक जावेद, सौदागर तौफीक हुसेन, संयोजक आर्किटेक्ट इकबाल सय्यद, डॉ.कमर सुरुर, नगर व्यासपीठचे संयोजक सुधीर मेहता,उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण, सुशील शाह आदी उपस्थित होते.
सभागृहात हास्यकल्लोळ
शायर आजाद अन्वर यांच्या नाद पठणाने मुशायराचा प्रारंभ झाला.प्रसिद्ध हास्य कवी मुजावर मालेगावी यांच्या हास्य, विडंबन रचनांनी सभागृहात हास्यकल्लोळ झाला. त्यांनी देशभक्तीपर रचनाही ऐकविल्या.
उपस्थित अंतर्मुख
अमरावतीचे शायर इकबाल साहिल यांच्या ‘हादसे ऐसे भी होते है यहाँपर साहिल .... आदमी घर नही आता खबर आती है’ या रचनेने मानवी जीवनातील असुरक्षितता कथन केली. ‘दिल को फिर दर्द से आबाद किया है मैने .... मुद्दतो बाद तुझे याद किया मैने’या रचनेने महेताब आलम यांनी प्रेम भावनेची अनुभूती रसिकांपुढे मांडली तर आई बद्दलच्या भावना मांडताना मुस्लीम खरगोन्वी यांनी ‘माँ की नसीहतोसे मुहब्बत ना कर सके....हम नेकीयो वाली भी तिजारत ना कर सके’असे सांगत उपस्थितांना अंतर्मुख केले.
कवयित्री मुमताज पीरभाई यांनी सादर केलेल्या सुरेल रचनांना उपस्थितांनी दाद दिली.कवि मंजूर नदीम,बिलाल अहमदनगरी, गनी मोहंमद गनी, मोहंमद शाकीर सर,तौफिक हुसेन, कवयित्री डॉ.कमर सुरुर यांनी सादर केलेल्या गजल रचनांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
स्वातंत्र्य संग्रामावर भाष्य
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ शायर डॉ. नईम अख्तर यांनी ‘उल्फते इकबाल, इश्के मीर कैसे बेच दूँ ...ऐ वतन दिल की ये जागीर कैसे बेच दूँ ,इसमें आजादी के नारों की खनक मौजूद है...कैदीयों के पाँव की जंजीर कैसे बेच दूँं’ या रचनेतून स्वातंत्र्य संग्रामावर भाष्य केले.
मान्यवरांचा सत्कार
महोत्सवाचे संयोजक सुधीर मेहता यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सलीम मणियार यांनी मुस्लीम बँकेच्या उपक्रमाची माहिती देऊन मुशायरा संयोजकांचे कौतुक केले. इंजि. इकबाल सय्यद, आबीद खान, राजूभाई आदींनी संयोजन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Musherat Rangale Nagarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.