तरुणीचा डोक्यात दगड घालून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST2021-03-16T04:20:54+5:302021-03-16T04:20:54+5:30
राहुरी : राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ नगर-मनमाड महामार्गाच्या बाजूला एका २२ ते २५ वर्षे वयाच्या तरुणीचा रविवारी ...

तरुणीचा डोक्यात दगड घालून खून
राहुरी : राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ नगर-मनमाड महामार्गाच्या बाजूला एका २२ ते २५ वर्षे वयाच्या तरुणीचा रविवारी रात्री मृतदेह आढळून आला आहे. डोक्यात मोठा दगड घालून तिचा निर्घृण खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी राहुरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ देशमुख-गिते वस्तीच्या रस्त्यावर नगर-मनमाड महामार्गापासून चाळीस फूट अंतरावर तरुणीचा मृतदेह पडलेला होता. स्थानिक शेतकरी विशाल गिते यांच्या पोल्ट्रीसाठी मध्यरात्री दोन वाजता कोंबडी खाद्याचे वाहन येणार होते. त्यासाठी गिते हे रात्री नगर-मनमाड रस्त्याकडे दुचाकीवर चालले होते. दुचाकीच्या उजेडात त्यांना मृतदेह दिसला. त्यांनी तत्काळ पोलिसांच्या गस्ती पथकाला माहिती दिली.
पहाटे चार वाजता पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक मधुकर शिंदे, उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ, कॉन्स्टेबल जालिंदर साखरे, वैभव साळवे, उत्तरेश्वर मोराळे, दिनेश आव्हाड, जानकीराम खेमनर, अण्णासाहेब चव्हाण, गृहरक्षक दलाचे सचिन पवार घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी सकाळी सहा वाजता नगर येथून फॉरेन्सिक पथक, ठसे तज्ज्ञ व रक्षा नावाच्या श्वानासह पोलीस पथक दाखल झाले. श्वानाने नगर-मनमाड रस्त्यापर्यंत माग दाखविला. घटनास्थळी आढळलेल्या फुटलेल्या दारूच्या बाटलीवरील ठसे व मृतदेहाच्या शेजारी पडलेल्या दगडावरील रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
रविवारी मध्यरात्री अकरा ते दोनच्या दरम्यान खुनाची घटना घडली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी परिसरातील सर्व लॉजिंगमध्ये जाऊन मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. परिसरातील नगर-मनमाड रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.
...
तरुणीची ओळख पटविण्याचे काम सुरू
मृत तरुणीच्या अंगावर पंजाबी ड्रेस असून, नारंगी रंगाची सलवार, गर्द आकाशी रंगाचा कुर्ता आहे. डाव्या हातावर मनगटाच्या खाली इंग्रजी अक्षरात ‘शीतल’ व डाव्या हाताच्या अंगठ्या खाली इंग्रजीत ‘एस.पी.’ असे गोंदलेले आहे. मृताच्या पायातील चप्पल घटनास्थळी आढळली नाही. आसपासच्या परिसरातील नागरिकांना तरुणीची ओळख पटली नाही. ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.