दोघा मित्रांनीच केला तिसऱ्या मित्राचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:26 IST2021-09-09T04:26:38+5:302021-09-09T04:26:38+5:30
अजय कारभारी जगताप या तरुणाचा खून झाला. खून करणारे अक्षय सुधाकर थोरात (वय २४), रोहित बंडू खरात (२२) या ...

दोघा मित्रांनीच केला तिसऱ्या मित्राचा खून
अजय कारभारी जगताप या तरुणाचा खून झाला. खून करणारे अक्षय सुधाकर थोरात (वय २४), रोहित बंडू खरात (२२) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
काही वर्षांपूर्वी शिर्डीतील भीमनगर येथे राहत असलेला अजय जगताप सध्या संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे राहत होता. बहिणीला भेटण्यासाठी तो शिर्डीत आला होता. तीन दिवसांपूर्वी अजय याचा अक्षय थोरात याच्याशी किरकोळ वाद झाला होता. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अजय जगताप वाद मिटविण्यासाठी अक्षय थोरात याच्या रिंगरोडवरील असलेल्या दुकानात गेला. अक्षय दुकानात राहतो. त्यावेळी त्यांच्यात चर्चा झाली. चर्चेत वादही मिटला. यावेळी रोहित खरात उपस्थित होता. वाद मिटल्यानंतर तिघांनी पार्टी केली. पार्टी झाल्यानंतर अक्षयने अजयला घरी जाण्यास सांगितले. मी इथेच झोपणार आहे, असे सांगत अजय लघुशंकेसाठी बाहेर गेला. लघुशंकेनंतर अजय पुन्हा दुकानात आला. त्यावेळी त्याच्या कमरेला कोयता असल्याचे अक्षय व रोहितच्या लक्षात आले. वादाच्या कारणावरून अजय आपल्याला मारेल या शंकेने अक्षय व रोहितने कोयता हिसकावून घेतला. त्यानंतर तत्काळ वार करून अजयचा खून केला. या घटनेनंतर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अक्षय थोरात व रोहित खरात यांनी पोलीस ठाण्यात जाऊन खून केल्याची माहिती पोलिसांना दिली, अशी माहिती पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली.
त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन खात्री केली. यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी रात्रीच घटनास्थळाला भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक रूपवते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.