लोकमत न्यूज नेटवर्क
राहाता (जि. अहिल्यानगर) : शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या काकडी शिवारात (ता. राहाता) शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बाप-लेकाचा खून करण्यात आला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी भोसले यांच्या वस्तीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात कृष्णा साहेबराव भोसले (वय ३०) व त्यांचे वडील साहेबराव पोपट भोसले (वय ६०) यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने बारा तासांच्या आत दोन आरोपींना अटक केली असून त्यांनी चोरीच्या उद्देशाने मारहाण केल्याची कबुली दिली आहे.
कृष्णाचे वडील साहेबराव भोसले यांना प्रवरा दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या साहेबराव यांच्या पत्नी साखरबाई भोसले (वय ५५) या गंभीर असून त्यांच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी घरात प्रवेश करत अचानक हल्ला केला. या घटनेत घरात असलेल्या गजुबाई मारुती दिघे (वय ८५) या वृद्ध महिला बचावल्या आहेत. त्यांना ऐकू येत नसल्याने आणि दिसत नसल्याने झालेला हल्ला त्यांच्या लक्षात आला नाही.दूध न आल्यामुळे घटना उघडकीस
भोसले यांच्या घरून सकाळी दूध न आल्यामुळे दूध केंद्र चालकाने भोसले यांच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्याशी संपर्क साधला, ते शेतकरी भोसले यांच्या घरी गेले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.शुक्रवारी (दि. ४) रात्री साहेबराव पोपट भोसले (रा. दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी ता. राहाता) यांचे राहते घरी अज्ञातांनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केला. त्यात कृष्णा साहेबराव भोसले ( वय ३०) आणि साहेबराव पोपट भोसले (वय ६०) यांना जीवे ठार मारले. तसेच त्यांच्या पत्नी साखरबाई साहेबराव भोसले (वय ५५) यांना गंभीर जखमी केले. चोरट्यांनी मोटारसायकल व मोबाइल चोरून नेला. याबाबत राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.