खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची हत्या; तिघांविरोधात दोषारोेपपत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST2021-09-14T04:25:35+5:302021-09-14T04:25:35+5:30
संग्राम प्रकाश कांडेकर, अनिकेत प्रकाश कांडेकर व राजेश भाऊसाहेब शेळके (रा. तिघे नारायणगव्हाण ता. पारनेर) यांच्याविरोधात हे दोषारोपपत्र दाखल ...

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची हत्या; तिघांविरोधात दोषारोेपपत्र दाखल
संग्राम प्रकाश कांडेकर, अनिकेत प्रकाश कांडेकर व राजेश भाऊसाहेब शेळके (रा. तिघे नारायणगव्हाण ता. पारनेर) यांच्याविरोधात हे दोषारोपपत्र दाखल झाले आहे.
खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेला आरोपी राजाराम शेळके याला पॅरोल रजा मिळाल्याने तो नारायणगव्हाण येथे आला होता. ११ जून २०२१ रोजी तलवारीने हल्ला करून शेळके याचा खून झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी संग्राम कांडेकर, अनिकेत कांडेकर, राजेश शेळके यांच्यासह इतर आरोपींना अटक केली. सुपा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. तपासात खुनाच्या गुन्ह्यात तिघांचाच सहभाग समोर आल्याने त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
-------------------------
सख्खे भाऊ आरोपी
दोषारोपपत्रात नाव असलेले संग्राम आणि अनिकेत हे दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यांचे वडील प्रकाश कांडेकर यांचा अकरा वर्षांपूर्वी खून झाला होता. राजाराम शेळके याने सुपारी देऊन ही हत्या केली होती. या गुन्ह्यात शेळके व त्याच्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. पित्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच राजाराम शेळके याची या दोघांनी कट रचून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच या हत्येत राजेश शेळके याचाही सहभाग आढळून आला आहे.