शिर्डी : आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीतगुन्हेगारी राज हळूहळू डोके वर काढू लागली आहे. गुरूवारी रात्री काही गुंडांनी निमगाव हद्दीतील देशमुख चारी जवळील राहणाऱ्या रवींद्र साहेबराव माळी (वय-३७ ) या किराणा दुकानदाराचा मानेवर चाकूने वार करून खून केला आहे. या प्रकरणी अकरा जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिर्डीच्या शासकीय गेस्ट हाऊस समोरील देशमुख चारी येथे निमगाव हद्दीमध्ये रवींद्र साहेबराव माळी यांचे व आरोपी यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याची तक्रार शिर्डी पोलीस स्टेशनला रवींद्र साहेबराव माळी यांनी केली होती. याचा राग धरून अजय वैजनाथ भांगे, विशाल रमेश पाटील, रविंद्र बनसोडे, समीर शेख, अज्जु पठाण, रंजना वैजनाथ भांगे, ललिता रमेश पाटील, सुनील लोखंडे, अक्षय शिंदे, महेश गायकवाड, कुणाल जगताप आदी अकरा जणांनी १९ नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजेदरम्यान देशमुख चारीजवळ माळी यास तीन जणांनी पकडून त्याच्यावर चाकूने वार केले. घटना कळताच पोलिस उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलिस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तातडीने निर्णय घेत परिसरात आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. पाच आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश आले असुन उर्वरितांचा शोध सुरू आहे. मयत रविंद्र माळी यांचा मुलगा रोहित माळी याने दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
शिर्डीत किराणा दुकानदाराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 17:24 IST