लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण आणि हत्याप्रकरणात सोमवारी पोलिसांनी शहरातील दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. आरोपींविरुद्ध सबळ पुरावे असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासाची सर्व माहिती गृहमंत्र्यांकडे सादर केली जाणार असून, मंगळवारी अधिवेशनात या हत्याकांडावर प्रकाश पडेल.
जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी सोमवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, संगमनेर येथील उपअधीक्षक राहुल मदने, निरीक्षक संजय सानप उपस्थित होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बिट्टू उर्फ रावजी वायकर व सागर गंगावणे यांचा समावेश आहे. हे दोघेही श्रीरामपूर शहरातील असून त्यांच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वायकर याच्याविरूद्ध २०१९ मध्ये एका कापसाच्या व्यापाऱ्याला लुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
पाटील म्हणाले, प्रारंभी या गुन्ह्यात बेपत्ता असल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात खूप लोकांची चौकशी केली. तीन ते चार पथके तपासात गुंतले आहेत. एकट्या शहर पोलीस ठाण्याच्या पथकाचे हे काम नाही. घाटी येथील रुग्णालयात मयत हिरण यांचे शवविच्छेदन करण्यात आले. अहवालात डोक्यावर गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी अधिवेशनात पोलीस तपासात हलगर्जीपणाचा आरोप केला होता. त्याबाबत मनोज पाटील यांना विचारले असता तसे काही असल्यास निदर्शनास येईल, असे ते म्हणाले.
---------
अधिवेशनात पडणार प्रकाश
हिरण यांचे अपहरण आणि हत्येमागील कारणाचा उलगडा मात्र मनोज पाटील यांनी केला नाही. केवळ आरोपींना परिसरातून अटक केल्याचे त्यांनी सांगितले. गुन्ह्यातील इतर आरोपींचा सहभाग, हत्येमागील प्रमुख कारण तसेच हिरण यांचा मृतदेह कोठे लपविला याविषयी बोलण्याचे त्यांनी टाळले. मंगळवारी अधिवेशनात माहिती दिली जाणार असून, आता काहीही सांगणे योग्य नाही, असे पाटील म्हणाले.
-------------