नगर अर्बन बँकेची ७ डिसेंबरला निवडणूक
By Admin | Updated: October 28, 2014 01:00 IST2014-10-28T00:15:56+5:302014-10-28T01:00:33+5:30
अहमदनगर : अर्बन बँकेची निवडणूक प्रक्रिया मंगळवार (दि.२८) पासून सुरू होणार आहे. बँकेची ७ डिसेंबरला मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

नगर अर्बन बँकेची ७ डिसेंबरला निवडणूक
अहमदनगर : अर्बन बँकेची निवडणूक प्रक्रिया मंगळवार (दि.२८) पासून सुरू होणार आहे. बँकेची ७ डिसेंबरला मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान अर्बन बँकेसंबंधीचे सर्व आरोप सहकार खात्याने फेटाळून लावले असून बँकेचा कारभार कायदेशीर असल्याबाबत शिक्कामोर्तब केले आहे. बँकेच्या हिताचे निर्णय घेतल्याने अध्यक्षांसह संचालकांना दोषमुक्त करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी २५ सप्टेंबर २०१४ रोजी एका आदेशाद्वारे बँकेला चौकशीमुक्त के ले आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने या आदेशाची आम्हाला माहिती नव्हती. सदर आदेश टपालाने मिळाला. त्यानंतर माहिती मिळविली. त्यामुळे आदेशाची माहिती देण्यास उशीर झाल्याचे बँकेचे अध्यक्ष दिलीप गांधी यांनी पत्रकारांना सांगितले.
कर्जवसुलीमध्ये दिलेली सूट, वाहन खरेदी व्यवहार, काष्टी शाखेतील सोनेतारण कर्ज आदी व्यवहारांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांवरून बँकेला विरोधी संचालकांनी लक्ष्य केले होते. बँकेच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि सहकार खात्याकडे याचिका दाखल केल्या होत्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी न्यायालयाने बँकेला दोषमुक्त केले होते. त्यानंतर आता सहकार खात्यानेही २५ सप्टेंबरला एका आदेशाद्वारे बँकेविरुद्ध केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सर्व कागदपत्रांची व दाखल केलेल्या पुराव्यांची पाहणी केल्यानंतर चौकशी अधिकारी यांनी बँकेच्या काही संचालकांना दोषी ठरविले असले तरी बँकेच्या कर्जवसुलीच्या प्रयत्नामुळे बँकेचे कोणतेही आर्थिक नुकसान झाले नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये कोणत्याही प्रकारचे गंभीर आक्षेप नमूद केले नाहीत, असे खासदार गांधी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)