महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड
By Admin | Updated: October 16, 2016 01:09 IST2016-10-16T00:34:07+5:302016-10-16T01:09:33+5:30
अहमदनगर : महापालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलने करायची, प्रशासनाने ताणायचे आणि दिवाळी जवळ आली, की काहीतरी पदरात द्यायचे,

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड
अहमदनगर : महापालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलने करायची, प्रशासनाने ताणायचे आणि दिवाळी जवळ आली, की काहीतरी पदरात द्यायचे, असा नेहमीचा प्रशासन-कर्मचारी यांच्यातील संघर्षाला यंदा महापालिकेत प्रथमच विराम मिळाला आहे. महापौर सुरेखा कदम यांनी प्रशासन व कामगार युनियन यांची संयुक्त बैठक घेऊन दिवाळीसाठी कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये १० हजार रुपये अग्रिम, तर ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानाच्या रकमेचा समावेश आहे.
दिवाळीसणानिमित्त २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी महापालिका कामगार युनियनतर्फे करण्यात आली होती. याबाबत १४ आॅक्टोबरला आंदोलन करण्याचा निर्णयही युनियनने जाहीर केला होता. त्यामुळे महापौर सुरेखा कदम यांनी शनिवारी तातडीने बैठक बोलावून सानुग्रह अनुदानाबाबत निर्णय जाहीर केला. या बैठकीला उपमहापौर श्रीपाद छिंदम, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव, सभागृह नेते अनिल शिंदे, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, उपायुक्त अजय चारठाणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप झिरपे, कामगार युनियनचे कॉम्रेड अनंत लोखंडे, आनंद वायकर आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या आर्थिक स्थितीची संपूर्ण माहिती महापौरांनी जाणून घेतली. त्यामध्ये जास्तीत जास्त किती रक्कम देता येईल, याची रक्कम निश्चित करून बैठकीत तोडगा काढण्यात आला. कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येऊ न देता सानुग्रह अनुदान देऊन कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करीत असल्याचे महापौर कदम यांनी सांगितले. आता कर्मचाऱ्यांनी उत्साहात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मालमत्ताकराची वसुलीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता दहा हजार रुपये देणेच शक्य होते. मात्र अधिकची वसुली करून देण्याची हमी कर्मचाऱ्यांच्या वतीने युनियनने दिल्याने आणखी पाच हजार सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.