मनपाने १५ लाख डोस खरेदीची ग्लोबल निविदा काढावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:21 IST2021-05-19T04:21:58+5:302021-05-19T04:21:58+5:30
अहमदनगर : महापालिकेने शहरात लसीकरण सुरू केले आहे. मात्र पुरेशी लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे महापालिकेनेच नगरकरांसाठी १५ लाख ...

मनपाने १५ लाख डोस खरेदीची ग्लोबल निविदा काढावी
अहमदनगर : महापालिकेने शहरात लसीकरण सुरू केले आहे. मात्र पुरेशी लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे महापालिकेनेच नगरकरांसाठी १५ लाख डोस खरेदी करण्यासाठी ग्लोबल निविदा काढावी,अशी विनंती आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे मंगळवारी केली.
आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना याबाबत पत्र दिले आहे. या पत्रात जगताप यांनी नमूद केले आहे, की नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. मध्यंतरी मृत्यू दरही वाढला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महापालिकेच्या वतीने कोरोनावरील लस देण्यात येत आहे. परंतु, शहराची लोकसंख्या पाहता उपलब्ध होणारी लस अत्यंत कमी प्रमाणात आहे. सध्याच्या संकट काळात इतर बाबींपेक्षा नागरिकांचे जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर अहमदनगर महानगरपालिकेने १५ लाख डोस खरेदी करण्यासाठी तातडीने ग्लोबल निविदा प्रसिद्ध करावी. त्यासाठी महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांचा निधी वापरावा. तसेच इतर पक्षातील जे नगरसेवक लस खरेदीसाठी अनुकूल असतील, त्यांचा निधी लसीकरणासाठी घ्यावा. याशिवाय शासनाकडून आपल्यालाही कोविड साठी काही प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे. हा निधी लस खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. शहरातील लोकसंख्या विचारात घेऊन दोन डोस देता येतील, एवढी लस पालिकेने खरेदी करावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.
....