अहमदनगर : महापालिकेचा विरोधी पक्षनेता ठरविण्यासाठी भाजपची शनिवारी बैठक बोलविण्यात आली होती. ही बैठक रद्द झाली असून, विरोधी पक्षनेते पद नेमणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता पदावरून भाजपमध्ये सुरू झालेला वाद आणखी काही दिवस सुरू राहील, असे दिसते.
महापालिकेत महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे. सर्वात मोठा विरोधी पक्ष भाजप आहे. भाजपने विरोधी पक्षनेता पदावर दावा ठोकला आहे. परंतु, शहर भाजपमध्ये एकमत नाही. विरोधी पक्षनेता पदावरून भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. हा वाद भाजप प्रदेशपर्यंत पोहोचला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत शनिवारी बैठक बोलविली होती. मात्र, ऐनवेळी बैठक रद्द झाली. प्रदेशाध्यक्ष पाटील हे २२ ते २५ जुलै दरम्यान नगर दौऱ्यावर येणार असल्याचे समजते. त्यावेळी नगरसेवकांशी चर्चा करून विरोधी पक्ष नेता ठरविला जाणार असल्याचे वृत्त आहे.
विरोधी पक्ष नेता पदासाठी भाजपकडून माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर आणि नगरसेवक तथा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे इच्छुक आहेत. माजी महापौर वाकळे व कोतकर यांनी नगरसेवकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सह्या घेतल्या आहेत. परंतु, प्रदेशकडून अद्याप नाव निश्चित झालेले नाही. त्यात प्रदेशची बैठकही रद्द झाली आहे. विरोधी पक्षनेता नियुक्त करण्याचा अधिकार महापौरांचा आहे. महापौर पद शिवसेनेकडे आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेता नियुक्तीबाबत आमदार संग्राम जगताप यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गतवेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले. यावेळी विरोधी पक्षनेता पदासाठी वाकळे हे इच्छुक असून, त्यांचे सेना व राष्ट्रवादीशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे भाजप प्रदेशाचा निर्णय येईपर्यंत महाविकास आघाडी थांबेल का याबाबत साशंकता आहे.
....
महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष
विरोधी पक्षनेता पदाबाबत भाजपमध्ये एकमत नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेता पदाची नियुक्ती लांबणीवर पडल्याने इतर सभागृह व महिला बालकल्याण समितीचाही निर्णय लांबणीवर पडणार आहे.याबाबत महाविकास आघाडी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.