मुंडेंची ‘मावशी’ हळहळली

By Admin | Updated: June 4, 2014 00:16 IST2014-06-04T00:08:33+5:302014-06-04T00:16:12+5:30

अहमदनगर/पाथर्डी : ‘परळी माझी आई आणि पाथर्डी माझी मावशी’ असं घट्ट नातं सांगणार्‍या गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने पाथर्डीसह नगर जिल्हा शोकसागरात बुडाला.

Mundane's 'Mawshi' became heartbroken | मुंडेंची ‘मावशी’ हळहळली

मुंडेंची ‘मावशी’ हळहळली

अहमदनगर/पाथर्डी : ‘परळी माझी आई आणि पाथर्डी माझी मावशी’ असं घट्ट नातं सांगणार्‍या गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने पाथर्डीसह नगर जिल्हा शोकसागरात बुडाला. बीड आणि नगरशी भौगोलिक जवळिकता, वंजारी समाजाची मोठी संख्या, हजारोंच्या संख्येने असलेल्या ऊस तोड मजुरांचे नेतृत्त्व, श्रद्धास्थान असलेले भगवानगड आणि खासगी साखर कारखान्यांच्या माध्यमातून मुंडेंचा नगर जिल्ह्याच्या राजकारणावर नेहमीच प्रभाव राहिला. पाथर्डी तालुका उसतोडणी कामगारांचा तालुका म्हणून राज्याला परिचीत आहे. या तालुक्यातील पन्नास हजार तोडणी मजूर दरवर्षी तोडणीसाठी घर दार सोडून सहा महिने कारखान्यावर जातात. १९९१ मध्ये उसतोडणी कामगारांनी आपल्या हक्कासाठी पुकारलेल्या संपावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. मुंडे यांनी त्यावेळी तोडणी कामगारांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. तेव्हापासून मुंडे यांचा नगरसारख्या साखर सम्राटांच्या जिल्ह्यावर प्रभाव निर्माण झाला. उत्तर जिल्ह्यापेक्षा दक्षिणेतील राजकारण आणि समाजकारणाशी त्यांचा गेल्या ४० वर्षांपासून स्नेहबंध होता. भगवानगडावर १९७२ पासून मुंडे हे न चुकता दसरा मेळाव्याला उपस्थित रहायचे. गडाच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. गडावरील त्यांची भाषणे ऐकण्यासाठी भाविकांसह उसतोडणी मजूर मोठ्या संख्येने हजर रहायचे. ‘भगवानगडावरून मला दिल्ली दिसते’, असे ते म्हणायचे. सर्वपक्षीय नेत्यांना त्यांनी भगवानगड दाखविला. गडाच्या विकासासाठी त्यांनी मोठे परिश्रम घेतले. बीडच्या राजकारणाबरोबरच नगरच्या राजकारणावरही मुंडे यांचा प्रभाव राहिला. ओबीसींचे नेते म्हणून लोक त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत होते. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुंडे हे पहिल्यांदा भगवानगडावर आले होते. तेथून ते चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. ‘तुमचं घोंगडं अंगावर घेतलं’ अशा शब्दात धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ते कटिबद्ध झाले होते. हीच त्यांची नगर जिल्ह्यातील अखेरची भेट ठरली. (प्रतिनिधी) पाथर्डी तालुक्यातील लाखो नागरिकांचा मुंडे हे जीव की प्राण होते. ते येणार असे कळल्यावर ग्रामीण भागातील थवेच्या थवे भल्या सकाळीच शहरात येवून थांबायचे. त्यांना कितीही उशीर झाला तरी त्यांचेवर प्रेम करणारी माणसं त्यांना पाहिल्याशिवाय, त्यांचे भाषण एैकल्याशिवाय जागची हालत नव्हती. त्यांना पाहण्यासाठी, ते काय बोलतात यासाठी लाखो जनसमुदाय उन्हा-तान्हाची पर्वा न करता तासनतास थांबायची. मुंडे यांच्यावर तालुक्यातील जनतेचे अतुट प्रेम होते. मुंडेनीही पाथर्डीला कधी परके मानले नाही. त्यामुळेच मुंडे हे तालुकावासीयांचा जीव की प्राण होते. 2१९८० साली प्रदेशाध्यक्ष असताना ते पाथर्डीत राजकीय कार्यक्रमासाठी आले. या ३४ वर्षाच्या कालखंडात त्यांनी तालुकावासीयांचे इतके प्रेम मिळविले की त्याची गणनाच कशात होवू शकत नाही. सुरवातीच्या काळात त्यांचे बरोबर कै. जीवराज महाराज जोशी, विजयकुमार छाजेड, अशोकराव गर्जे, अशोक मंत्री,अशोक बाहेती, प्रमोद शेवाळे आदि बोटावर मोजण्यासारखे कार्यकर्ते होते. कार्यकर्ते कमी असले तरी ते हाडाचे असले तरी सगळं बरोबर जुळून येते हे मुंडे या कार्यकर्त्यांना नेहमी सांगत असायचे. त्यानंतर १९९० साली झालेल्या पालिकनिवडणुकीच्या प्रचारासाठी ते पाथर्डीत आले होते. 3पाथर्डी तालुक्यातून सुमारे ५० हजार तोडणी मजूर दरवर्षी तोडणीसाठी घर दार सोडून वर्षातून सहा महिने कारखान्यावर जातात . १९९१-९२ साली उसतोडणी कामगारांनी आपल्या हक्कासाठी संप पुकारला होता. या संपावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले. मुंडे यांनी त्यावेळेस तोडणी कामगारांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करीत त्यांना न्याय मिळवून दिला. 4१९९४ ला निघालेल्या संघर्ष यात्रेने त्यांची आणि तालुकावासीयांची नाळ खर्‍या अर्थाने जुळली. त्यानंतर तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातील कार्यकर्त्याला ते नावाने हाका मारू लागले. त्यांचे भाषण चालू असले की पाच सहा नावे ते हमखास घेणार अशी त्यांची खासीयत होती. राज्याचे भविष्य घडविणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या सारख्या कर्तबगार नेत्याला देशपातळीवर काम करण्याची संधी मिळाली. मात्र, संधीचे सोने करण्याच्या आतच काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने देशाचे व राज्याचे मोठे नुकसान झाले. ते माझे व्यक्तिगत मित्र होते. भविष्यात राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा मला विश्वास होता. कष्टाळू व बहुजन समाजाचे हित बघणारा नेता दुदैवाने काळाच्या पडद्याआड गेला आहे. एका संघर्षाचा अंत झाला. - बाळासाहेब विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री. देशाचे ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे हे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी समाजाचे जानकार व्यक्तिमत्व होते़ त्यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र एका प्रबळ नेत्याला मुकला आहे़ ग्रामीण महाराष्ट्रातील आम जनतेचा संसद व विधीमंडळातील आवाज हरपला. - शंकरराव कोल्हे, माजी मंत्री राजकारणाच्या पलिकडे जाऊन मित्र करण्यात त्यांचा हातखंडा होता. दुसर्‍यांदा विधान परिषदेला उभा असताना त्यांची भेट घेतली. त्या भेटीत त्यांनी ‘तुमच्यासारखा सुसंस्कृत नेता निवडून आला पाहिजे. उगाच कुणाला निवडून दिले तर ते महाराष्ट्राचेच नुकसान आहे. आमची सर्व मते तुम्हालाच’ असे सांगून निर्धास्त केले. आणि दिलेला शब्द त्यांनी प्रत्यक्षात उतरवलाही. अंबेजोगाईतील संमेलनाच्या नियोजनासाठीही त्यांनी हक्काने बोलून घेतले. आमची यंत्रणा संमेलन यशस्वीतेसाठी झटली. कर्तृत्वान नेत्याची कारकीर्द अशा तºहेने संपवी हे दुर्दैव. - यशवंतराव गडाख, मा. खासदार. युवा मोर्चात काम करताना १९८० साली त्यांच्याशी माझा संपर्क आला. संघर्ष यात्रेत जिल्ह्यात सर्वाधिक सभा मी घ्यायला लावल्या होत्या. १९९५मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी केलेली टँकरमुक्ती, भारनियमनमुक्त महाराष्ट्र, बीओटी कामे वाखाणण्यासारखी आहेत. त्यामुळे मी खूप काही शिकलो. दक्षिण भागात कुकडीचे पाणी मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. केंद्रात मंत्रिपदामुळे त्यांना विशेष आनंद झाला होता. महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प त्यांनी परवाच बोलून दाखवला होता. अष्टपैलू नेता कसा असतो हे त्यांच्यामुळे पाहायला मिळाले. - दिलीप गांधी, खासदार, नगर. कर्जत-जामखेडमध्ये सलग तीनदा आमदार झालो. याचे श्रेय मुंडेसाहेब, हासू आडवाणी, प्रमोद महाजन यांना जाते. माझी राजकारणाची सुरूवातच त्यांच्यामुळे झाली. त्यांनी माझ्यावर मुलासारखे प्रेम केले. कार्यकर्ता कसा घडवावा हे त्यांच्यापासून शिकलो. राजकीय असो नाही तर वैयक्तिक प्रत्येक अडचणीत त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या जाण्याने नगरचे मोठे नुकसान झाले आहे. - सदाशिव लोखंडे, खासदार, शिर्डी. गोपीनाथजी, विलासरावजी व मी १९८० विधानसभेत एकत्र पाऊल टाकले. राजकारणात समोरासमोर होतो, मात्र व्यक्तीगत जीवनात मैत्रीचे धागे पक्के होते. गोपीनाथरावांच्या जाण्याने ग्रामीण महाराष्ट्राचे मोठे नुकसान होणार आहे. एक सच्चा दिलखुलास मित्र हरपला. - बबनराव पाचपुते, आमदार. माझा अजूनही त्यांच्या जाण्यावर विश्वास बसत नाही. माझा राजकीय गॉडफादर गेल्याने मी पोरका झालो आहे. मुलाप्रमाणे त्यांनी माझी काळजी घेतली. कार्यकर्त्यांना, गोरगरिबांना जीव कसा लावायचा हे त्यांनी शिकवले. माझे तिकीट बदलण्याचा प्रयत्न असताना त्यांनी तो हाणून पाडला. मध्यरात्री १ वाजता फोन करून ‘तू निश्चिंत राहा. तिकीट तुलाच आहे. आणि निवडूनही मीच आणील,’ असा शब्दही दिला होता. - राम शिंदे, आमदार, गोपीनाथ मुंडे राज्यातील गरीब व मागासलेल्या ओबीसी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आता पुढाकार घेणार होते. त्यांच्या निधनामुळे मागासलेल्या ओबीसी जनतेचे, बहुजन समाजाचे व संघटनांचे मोठे नुकसान झाले आहे. माझ्या व अण्णा हजारे यांच्या शब्दावर त्यांनी आमचा बंद पडलेला साखर कारखाना चालवून संजीवनी दिली होती. सन २००४ ते २००९ या काळात विधानसभेत त्यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य लाभले. परंतु काळाने त्यांना हिरावून नेले. प्रमोद महाजन तीन मे रोजी, गोपीनाथ मुंडे तीन जून रोजी व विलासराव देशमुख केंद्रीय ग्रामविकासमंत्री असताना स्वर्गवासी झाले. पुन्हा त्यांचेच मित्र गोपीनाथ मुंडे हेच खाते असताना निर्वतले, हा नियतीचा खेळ कसा आहे हे समजत नाही. - विजय औटी, आमदार, प्रचंड लोकसंग्रह असलेला आणि समाज जीवनाशी एकरूप झालेला लोकनेता म्हणजे गोपीनाथराव मुंडे़ पक्षविरहित मैत्री जपून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, एक असामान्य मराठमोळा नेता आज आपल्यात नाही़ याचे दु:ख वाटते़ स्व़ शंकरराव काळे यांच्या कृतज्ञता सोहळ्यास मुंडे यांनी एप्रिल २०११ मध्ये कोपरगावला हजेरी लावली होती़ स्व़ काळे व मुंडे यांचे स्नेहाचे संबंध होते. - अशोक काळे, आमदार, कोपरगाव. गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व हे सामान्य माणसांत रमणारे होते. बीडसारख्या ग्रामीण भागात त्यांनी मोठे विकासात्मक काम केले. राज्यभर पक्षविरहित कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण करून त्यांनी जनसामान्यांची मने जिंकली. विविध विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी करताना कधीही व्यक्तिदोष केला नाही. मुंडे यांच्या निधनामुळे ग्रामीण जनतेचे सुसंस्कृत नेतृत्व हरपले आहे. - डॉ. सुधीर तांबे, आमदार महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून मुंडे यांची छाप आठवणीत राहण्यासारखी आहे. मुंडे यांचा विधानसभेतील सहवास २५ वर्षे जवळून पाहता आला. त्यांचे बोलणे, बसणे, वागण्याची ढब ऐटदार होती. विधानसभेत त्यांच्या बाकाच्या मागे बसण्याचा अनेकवेळा योग आला. त्यांच्या सहवासातील अनेक क्षणांचा चित्रपट डोळ््यासमोरून उभा राहिला आहे. एक चांगला राजकारणी,नेता गमावल्याचे दु:ख आहे. ते आपल्यात नाहीत, यावर अजुनही विश्वास बसत नाही. - अनिल राठोड, आमदार (शिवसेना उपनेते) गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले, त्यावेळी बाळासाहेब विखे यांच्यासोबत त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. माजी केंद्रीयमंत्री शरद पवार, स्व. विलासराव देशमुख यांच्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेतल्याशिवाय राज्याच्या राजकारणाचे वर्तुळ पूर्ण होणार नाही. त्यांच्या निधनाने राज्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. राजकारणापलीकडे वैयक्तिक संबंध त्यांनी जोपासले होते. अनेकदा फोनवरून त्यांच्याशी बोलणे झाले. राजकारणाशिवाय मैत्री जपणारा नेता म्हणून मुंडे यांची ओळख होती. - अरुण जगताप, आमदार केंद्रीय ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचा मुंडे यांचा माणस होता़ परंतु नियतीला ते मान्य नसावे़ त्यांच्या निधनाने राज्याची मोठी हानी झालेली आहे़ त्यांना माझ्या कुंटुंबीयांच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली़ साखर संघात काम करत असताना त्यांच्यासोबत अनेक बैठका घेण्याचा योग आला़ या बैठकीत ते नेहमीच ग्रामीण भागातील कष्टकर्‍यांचे मुद्दे प्रभावीपणे मांडायचे़ ग्रामीण भागाचा त्यांचा दांडगा अन्यास होता़ कष्टकर्‍यांना न्याय मिळवून देण्याचा मुंडे यांचा प्रयत्न असायचा़ - चंद्रशेखर घुले, आमदार गोपीनाथ मुंडे यांची शेवटची भेट भगवानबाबा गडावर झाली़ केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मुंडे यांचा हेलिपॅडवर भेट झाल्यानंतर सत्कार केला़ गडाकडे जाताना मला गाडीत बसून ते कार्यक्रमस्थळी घेऊन गेले़ चांगले खाते मिळाल्याने ग्रामविकासाचे खूप मोठे काम करायचे आहे, असे त्यांनी सांगितले़ मुंडे यांनी आपुलकीने केलेल्या चर्चेची ही शेवटची भेट ठरली़ माझे वडील अण्णासाहेब कदम यांना मुंडे हे गुरू मानत़ त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली. - चंद्रशेखर कदम, माजी आमदार, राहुरी़ महाराष्टÑाचे नेते मुंडे यांच्या निधनाने हूरहूर वाटली. महाराष्टÑाचे मोठे नुकसान झाले. ते आत्ताच देशाचे ग्रामविकास मंत्री झाले होते. त्यांनी देशातील व प्रामुख्याने महाराष्टÑातील ग्रामीण विकासाबाबत झुकते माप दिले असते. महाराष्टÑाचे मोठे नुकसान झाले. सर्वसामान्यांची जाण त्यांना होती. - भाऊसाहेब कांबळे, आमदार, श्रीरामपूर. ऊस तोडणी मजुराचे हित जोपासून साखर कारखानदारीला मदतीचा हात देणारा एक सच्चा नेता, उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथरावजी यांनी उमटविलेला ठसा स्मरणात राहील. सत्ता व समाज परिवर्तनाची धमक असलेला नेता हरपला. - शिवाजीराव नागवडे, माजी आमदार गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने त्यांचे कुटुंबीय व भाजपासोबतच देश, राज्य व प्रामुख्याने मराठवाड्याची हानी झाली आहे. त्यांचे नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व व दातृत्वास महाराष्टÑ मुकला आहे. त्यांचा पक्ष भाजपा असला तरी इतर पक्षांतील नेत्यांशी त्यांचे संबंध मित्रत्वाचे होते. अशा मित्रास आपण मुकलो आहोत. - भानुदास मुरकुटे, माजी आमदार महाराष्टÑातल्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसांचे प्रश्न माहीत असलेला, राजकारण, पक्षाच्या पलिकडे जाऊन महाराष्टÑाचा विचार करणारा, अतिशय जमिनीवर असणारा, जनतेला सहज भेटणारा नेता हरपला. महाराष्टÑाचे अपार नुकसान झाले. - जयंत ससाणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोपीनाथजी मुंडेंना अनेक वेळा भेटण्याची संधी मिळाली. सामान्य कार्यकर्त्यांना प्रोत्साहन आणि ऊर्जा देणारं नेतृत्व होत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच देवरूपी नेतृत्व हरपल. - बाळासाहेब नाहाटा, सभापती, बाजार समिती, श्रीगोंदा मुंडे यांच्या निधनाने राज्याचे कणखर नेतृत्व हरपले आहे. राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. एका कार्यक्रमानिमित्ताने नगरला आले होते. सहकार सभागृहात त्यांच्याशी माझी भेट झाली. दिलखुलास व स्पष्टोक्ता असलेला नेता म्हणून त्यांना ओळखले जायचे. राष्टÑवादी पक्षाच्यावतीने व माझ्या कुटुंबीयांच्यावतीने त्यांना श्रध्दांजली. - संग्राम जगताप, महापौर. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने बहुजन समाजाचा मोठा आधार गमावला आहे. माझ्या हॉटेलवर नेहमीच मुंडे येत असत. सामान्य कार्यकर्त्यांशी ते आपुलकीने संवाद साधायचे. सभेत गर्दी खेचणारा नेता होते. जनाधार असलेल्यापैकी मुंडे एक होते. लोकनेत्याच्या जाण्याने महायुतीचे मोठे नुकसान झाले आहे. - प्रा. शशिकांत गाडे, दक्षिण जिल्हा प्रमुख, शिवसेना मुंडे साहेबांशी गेल्या १०-१२ वर्षांपासून संबंध होते. ऊस तोडणी मजूर अल्पसंख्याक समाजाकडे विशेष लक्ष देणारा नेता. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्याला हा तिसरा झटका बसला. दिल्लीतील महाराष्टÑाची विकासरेषा पुसली. - कुंडलिकराव जगताप, संस्थापक कुकडी कारखाना

Web Title: Mundane's 'Mawshi' became heartbroken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.