मुळा, भंडारदरा धरणाची पाणीपातळी खालावली

By Admin | Updated: June 28, 2014 01:12 IST2014-06-27T23:39:35+5:302014-06-28T01:12:41+5:30

अहमदनगर: जिल्ह्यावरील पाणी संकट तूर्तास टळले असले तरी मान्सूनमध्ये सुधारणा न झाल्यास जिल्ह्यावर पाणी संकटाची शक्यता आहे़

Mulla, water level of Bhandardara dam decreased | मुळा, भंडारदरा धरणाची पाणीपातळी खालावली

मुळा, भंडारदरा धरणाची पाणीपातळी खालावली

अहमदनगर: जिल्ह्यावरील पाणी संकट तूर्तास टळले असले तरी मान्सूनमध्ये सुधारणा न झाल्यास जिल्ह्यावर पाणी संकटाची शक्यता आहे़ मुळा व भंडारदरा धरणातून दररोज प्रत्येकी १२ व २ दशलक्ष घनफूट पाणी उपसा होत असून, काटकसर न केल्यास अखेरच्या टप्प्यात तळातील पाणी घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही़ हे पाणी गाळमिश्रित असल्याने पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे़
जूनचा अखेरचा आठवडा सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही़ खबरदारीचा उपाय म्हणून शेतीचे पाणी बंद करण्यात आले़ जलसंपदा विभागास सतर्कतेचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़ उन्हाळी आवर्तन देऊन मुळाधरणात आज अखेर ६१८ दलघफू साठा आहे़ तर भंडारदरात ६८१ दलघफू उपयुक्त पाणीसाठा आहे़ भंडारदरा व मुळा जलाशयातून लाभक्षेत्रातून फक्त पाणी योजनांव्दारे पाणी उपसा होत आहे़ नगर शहरासह उत्तर नगर जिल्ह्याला पाणीपुरवठा होत असून, पाणी योजना व बाष्पीभवन, असे मिळून दररोज १२ दलघफू पाणी उपसा होत आहे़ उपसा अत्यल्प असला तरी धरणातील पाणीसाठ्याच्या तुलनेत ते प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे मुळा रिक्त होण्याच्या मार्गावर असल्याने प्रशासकीय यंत्रणाही धास्तावली आहे़
जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा भंडारदरा धरणाची यापेक्षा वेगळी स्थिती नाही़ भंडारदरा जलाशयातून श्रीरामपूर शहरासह इतर शहरांना पाणीपुरवठा होतो़ भंडारदरातून पिण्यासाठी १३ जुलै रोजी आवर्तन सुटणार आहे़ पाणी उपसा अधिक झाल्यास तळातील पाणी घ्यावे लागेल़ तळातील पाणी गाळमिश्रित असेल़ त्यामुळे पाणी उपसा करण्यात अडचण येईल़ ती येऊ नये यासाठी पाण्याची काटकसर करण्याची गरज असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे़
नगरला दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा
अहमदनगर : शेती अवर्तन सोडले नाही आणि बाष्पीभवन कमी झाले तर शहराला जवळपास दीड महिने पाणी टंचाई जाणवणार नाही, इतके पाणी मुळा धरणात असल्याचा दावा महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केला आहे. त्यामुळे शहराला जलसंकटाची धग जाणवणार नाही. दीड महिन्याच्या काळात पाऊस पडून धरणात नव्याने पाण्याची आवक होईल. शहरवासियांनी काळजी करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
नगर शहर आणि पाच ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास साडेचार लाख लोकांना महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. नगर शहराची लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेता शहरात दिवसाआड तर केडगावला दर तिसऱ्या दिवशी पाणी पुरवठा केला जातो. मुळा धरणातील पाण्यावर शहराची तहान भागविली जाते. मुळानगर, विळद व नागापूर येथे एकूण ५६० अश्वशक्तीचे पंप त्यासाठी अहोरात्र सुरू असतात. धरणात महापालिकेने दोन विहिरी खोदलेल्या आहेत. सध्या या विहिरी पाण्याखाली आहेत. धरणातील पाण्याची पातळी गुरूवार अखेर १ हजार ७५५.२० फूट इतकी आहे. १ हजार ७५२ फूट पाणी पातळीपर्यंत शहराच्या पाण्यावर कोणताही परिणाम होत नाही. त्याखाली पाणी पातळी गेली की पाण्याच्या उपसावर हळूहळू परिणाम होतो. पाण्याची पातळी कमी झाली की नगर शहरासह गवळीवाडा, विळद, वाकोडी, देहरे ग्रामपंचायतीच्या पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागतो.
गतवर्षी ओढावले
होते संकट
गतवर्षी १७५२ फूटाच्याखाली पाणी पातळी गेली होती. त्यामुळे शहरावर जलसंकट ओढावले होते. यंदा मात्र तशी वेळ येईल असे वाटत नसल्याचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम यांनी सांगितले.
नगर शहर व चार ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या : ४ लाख ५० हजार
शहराची गरज :८० दशलक्ष लीटर
धरणातून होणारा उपसा : ७० दशलक्ष लीटर
प्रत्यक्षात पुरवठा होणारे पाणी : ६४ लशलक्ष लीटर
शहरातील नळजोड : ४६ हजार ७००

Web Title: Mulla, water level of Bhandardara dam decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.