श्रीगोंद्यात राजकीय हालचाली गतिमान
By Admin | Updated: June 5, 2016 00:03 IST2016-06-04T23:53:26+5:302016-06-05T00:03:42+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदाच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक दहा जून रोजी होणार आहे. या निवडीसाठी राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी आमदार राहुल जगताप यांनी डावपेच टाकण्यास सुरू केली आहे.

श्रीगोंद्यात राजकीय हालचाली गतिमान
श्रीगोंदा : श्रीगोंदाच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक दहा जून रोजी होणार आहे. या निवडीसाठी राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी आमदार राहुल जगताप यांनी डावपेच टाकण्यास सुरू केली आहे. नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचे मन वळविण्यासाठी जि. प. उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांची मदत घेण्यात येणार आहे. यावर राजेंद्र नागवडे कोणती भूमिका घेतात? याकडे शहराचे लक्ष लागून आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमाचा अजेंडा नियमानुसार मिळाला नाही, हा धागा पकडून आमदार राहुल जगताप यांचे समर्थक, उपनगराध्यक्ष अख्तारभाई शेख, अर्चना गोरे, मीना शेंडगे यांनी या निवडणूक कार्यक्रमाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून नगराध्यक्षपदाची निवडणूक ४ ऐवजी १० जूनला घ्यावी, असे आदेश दिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सहलीवर गेलेले नगरसेवक पुन्हा परतले आहेत. परिणामी आता शहरात पुन्हा राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. पालिकेत आ. जगताप व नागवडे गटाचे ११ तर माजी मंत्री बबनराव पाचपुते, भोस गटाचे ८ नगरसेवक आहेत.
(तालुका प्रतिनिधी)
कुकडी साखर कारखान्याचे संस्थापक कुंडलिक जगताप यांनी नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले, मात्र नागवडे यांनी प्रतिसाद दिला नाही. आता आ. जगताप यांनी नागवडे यांच्या मतपरिवर्तनाची जबाबदारी अण्णासाहेब शेलार यांच्यावर सोपविली आहे. राजेंद्र नागवडे सध्या मुंबईत आहेत. ते मुंबईहून परतल्यानंतर राजकीय हालचालींना पुन्हा वेग येणार आहे. विधानसभा निवडणुकीत नागवडे यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी काँग्रेसचे तिकीट नाकारत राहुल जगताप यांना आमदार करण्यासाठी खिंड लढविण्यात आली. आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी बबनराव पाचपुते यांना शब्द दिलेला आहे. त्यामुळे नागवडे यांचे मन वळविणे जिकीरीचे आहे.