जवानाकडून आईची हत्या
By Admin | Updated: August 17, 2016 00:49 IST2016-08-17T00:37:29+5:302016-08-17T00:49:30+5:30
सुपा : आईच्या नावावरील शेती वाटून देत नाही म्हणून पारनेर तालुक्यातील पिंपरी गवळी येथे लष्करी सेवेतील जवानाने जन्मदात्या आईची हत्या केली.

जवानाकडून आईची हत्या
सुपा : आईच्या नावावरील शेती वाटून देत नाही म्हणून पारनेर तालुक्यातील पिंपरी गवळी येथे लष्करी सेवेतील जवानाने जन्मदात्या आईची हत्या केली. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.
जवानाचा पोलीस असलेला भाऊ जितेंद्र ऊर्फ हरिभाऊ केशव मांडगे (वय २६) याने फिर्याद दिली. पिंपरी गवळी येथे फिर्यादी जितेंद्र मांडगे, भारतीय लष्करात कारगील येथे सेवेत असणारा युवराज केशव मांडगे, आई ताराबाई केशव मांडगे व आजी अनुसया हराळ असे राहतात. वडिलांच्या निधनानंतर दोन्ही मुलांच्या नावावर तसेच आईच्या नावावर शेती वाटून देण्यात आली. आई ताराबाई मांडगे यांच्या नावावर असलेली ८ ते ९ एकर शेती लष्करी जवान युवराज वाटून मागत होता. प्रसंगी तो यावरून भांडत असे. १५ दिवसापासून युवराज सुट्टीवर आला होता. १३ आॅगस्ट रोजी संध्याकाळी आईने भाजी गरम वाढली नाही म्हणून त्याने भांडण केले व जेवण न करताच झोपला. १५ आॅगस्ट रोजी हरिभाऊ मांडगे कामावर गेला असता युवराज व आईत भांडण झाले व सकाळी ७ पासून आई घरात नसल्याचे मेहुणे प्रदीप रावसाहेब इथापे यांनी भ्रमणध्वनीवरून कळवले. शोधाशोध केल्यावर घरापासून ५० फूट अंतरावरील मळ्याच्या शेतात चेहऱ्यावर व गळ्यावर ओरखडल्याच्या जखमा, सुजलेला चेहरा व तोंडातून रक्तमिश्रीत द्रव असलेल्या ताराबाई मांडगे यांचा मृतदेह आढळून आला. युवराज केशव मांडगे यांनी जमीन वाटून देत नाही या कारणावरून वाद उकरून काढून तिला मारहाण करून ठार मारल्याचे जितेंद्र मांडगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांनी आरोपीस अटक केली.
(वार्ताहर)