आमदारांचा सर्वाधिक निधी रस्त्यावर खर्च
By Admin | Updated: July 25, 2014 00:26 IST2014-07-25T00:16:59+5:302014-07-25T00:26:34+5:30
अहमदनगर: शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांची दुरुस्ती होत नाही, अशी ओरड नेहमीच होते़ मात्र जिल्ह्यातील आमदारांनी आपला सर्वाधिक आमदार निधी रस्ते मजबुतीकरणावर खर्च केला आहे़

आमदारांचा सर्वाधिक निधी रस्त्यावर खर्च
अहमदनगर: शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांची दुरुस्ती होत नाही, अशी ओरड नेहमीच होते़ मात्र जिल्ह्यातील आमदारांनी आपला सर्वाधिक आमदार निधी रस्ते मजबुतीकरणावर खर्च केला आहे़ मतदारसंघात रस्ते मजबुतीकरण आणि गावोगावी सभागृह उभारण्यात सर्वच आमदार आघाडीवर आहेत.
विधानसभेची आचारसंहिता महिनाभरात जारी होईल़ निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला आमदारांनी सुरुवात केली आहे़ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदारांनी गेल्या पाच वर्षांपासूनच विकास कामांचा धडाका लावला होता़ निधी खर्च करण्यात सर्वच आमदार आघाडीवर असल्याचे जिल्हा नियोजनच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे़ विकासाची गती कायम ठेवत पदभार स्वीकारल्यापासून जवळपास ९० टक्के निधी खर्च करून आमदार मोकळे झाले आहेत़ सर्वाधिक निधी मतदारसंघातील रस्ते दुरुस्त करण्यावर खर्च केला आहे़ नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरराव गडाख यांनी १४७ रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत़ शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रस्त्यांची कामे केली़ त्याचबरोबर रस्त्यांवर दिवाबत्तीची १०० कामे पूर्ण केली आहेत़ श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार बबनराव पाचपुते यांनी मात्र आपला सर्वाधिक निधी सामाजिक सभागृहांवर खर्च केला असून, मतदारसंघात काहीप्रमाणात पथदिवेही बसविले आहेत़
अकोले मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री मधुकरराव पिचड यांनी सर्वाधिक सभामंडप बांधले आहेत़ कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम शिंदे यांनी सभागृहाची मतदारसंघात सावली केली आहे़ काही ठिकाणी युवकांसाठी व्यायमशाळाही उभारल्या आहेत़ नगर शहर मतदारसंघाचे आमदार अनिल राठोड यांनी मात्र सभागृहाला फाटा देऊन शहरातील रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यावर भर दिला आहे़ शेवगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रशेखर घुले यांनी वाड्या-वस्त्यांवरील रस्ते मजबूत केले आहेत़ उर्वरित निधीतून सभागृह आणि रस्त्यांवर आमदारांनी भर दिला असून, याकामाचे आराखडे जिल्हा नियोजन विभागाला सादर करण्यात आले आले आहेत़ (प्रतिनिधी)
कुठे किती सभामंडप
कर्जत-जामखेड- ४५
श्रीगोंदा- ६४
नगरशहर-१
शेवगाव-७
श्रीरामपूर-६
शिर्डी- १०
कोपरगाव-११
राहुरी- ४७
पारनेर- ३६
संगमनेर- २०
अकोले- ५६
रस्त्यांचे मजबुतीकरण
श्रीगोंदा- ११
नगरशहर- ७५
शेवगाव- ४३
श्रीरामपूर- ६०
कोपरगाव- २२
नेवासा- १७७
अकोले- ६३
व्यायामशाळा
कर्जत- १
शेवगाव-२
दिवाबत्ती
श्रीगोंदा- ६१
शिडी-१००
संगमनेर- ३०
संगणकीकरण
शिर्डी- २५
श्रीगोंदा- ५
कर्जत- लॅपटॉप
उर्वरित निधी स्मशानभूमी व शाळांसाठी
आमदारांनी रस्ते, सभागृह उभारण्यावर सर्वाधिक खर्च केला आहे़ ही कामे वगळता इतर काही कामे करण्यात आली असून, त्यामध्ये ग्रामपंचायतीचं संगणकीकरण, शाळा बांधकाम, स्मशानभूमी, संरक्षण भिंती आदींचा समावेश आहे़