अहमदनगर: नगर शहरात कावीळ साथ रोगाचे आणखी साठ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. महापालिकेने आतापर्यंत ३५ हजार घरांचा सर्व्हे केला असून त्यात नऊशेच्यावर नागरिकांना कावीळ झाल्याचे समोर आले. आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांच्या अधिपत्याखाली पथकाचा शहरात घरांचा सर्व्हे सुरू आहे. पथकाने बुधवारी १० हजार घरांचा सर्व्हे केला. त्यात ५९ काविळीचे नवीन रुग्ण आढळून आले. त्यातील १६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून ४३ जण प्राथमिक उपचारानंतर घरी परतले. पथकाने बुधवारी १३ हॉटेलमधील पाण्याचे नमुने तपासले. त्यात ३ हॉटेलमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले. या हॉटेलचालकांना महापालिकेने क्लोरिनेशन करून मगच पाणी पिण्यास वापरावे अशी नोटीस बजावली आहे. काविळीची साथ अजूनही अटोक्यात येत नसल्याचे यातून समोर येत आहे. महिनाभर ही साथ राहते. हळूहळू ती आटोक्यात येईल असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. (प्रतिनिधी)
काविळीचे आणखी साठ रुग्ण आढळले
By admin | Updated: October 27, 2023 17:19 IST