शेवगाव पंचायत समिती, तहसील कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST2021-09-25T04:21:46+5:302021-09-25T04:21:46+5:30
शेवगाव : विविध प्रलंबित मागण्यांसाठी तालुक्यातील आशा व गटप्रवर्तकांनी शुक्रवारी पंचायत समितीसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. याबाबतचे निवेदन तहसीलदार ...

शेवगाव पंचायत समिती, तहसील कार्यालयावर मोर्चा
शेवगाव : विविध प्रलंबित मागण्यांसाठी तालुक्यातील आशा व गटप्रवर्तकांनी शुक्रवारी पंचायत समितीसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. याबाबतचे निवेदन तहसीलदार सी. एम. वाघ, आरोग्य अधिकारी संकल्प लोणकर यांना दिले.
आशा व गटप्रवर्तकांनी शेवगाव पंचायत समिती येथे एकत्रित येऊन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संकल्प लोणकर यांना निवेदन दिले. यावेळी स्थानिक मागण्यांबाबतही चर्चा केली. यानंतर बाजारपेठेतून मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तहसील कार्यालय येथे तहसीलदार सी.एम. वाघ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲड. सुभाष लांडे, तालुका अध्यक्ष कॉ. संजय नांगरे, बापूराव राशीनकर, वैभव शिंदे, गहिनीनाथ आव्हाड, आशा व गटप्रवर्तक संध्या पोटफोडे, अंजली भुजबळ, सुनेत्रा महाजन, वैशाली झिरपे, वैशाली देशमुख, गीतांजली सोनवणे, प्रतिभा सातपुते, नीता शिनगारे, निशा जमदाडे, शोभा पंडित, सुवर्णा देशमुख, शोभा चव्हाण यांच्यासह तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
आशा व गटप्रवर्तक तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, किमान वेतन २१ हजार रुपये मिळावे, मानधन नको वेतन हवे, आशा व गटप्रवर्तकांना जुलैपासून लागू केलेली मानधन वाढ व प्रोत्साहन भत्ता दरमहा वेळेवर देण्यात यावा, जुलै महिन्यापासूनचे थकीत वाढीव मानधन फरकासह ताबडतोब द्यावे, सर्व योजना कर्मचारी यांना कायम सेवेत सामावून घेतले जावे आदी मागण्या केल्या.