पारनेरमध्ये मोर्चा,कर्जतमध्ये उपोषण
By Admin | Updated: January 14, 2016 23:04 IST2016-01-14T22:41:29+5:302016-01-14T23:04:46+5:30
पारनेर : इतर विविध प्रश्नी पारनेर तालुका राष्ट्रवादीच्यावतीने गुरूवारी पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

पारनेरमध्ये मोर्चा,कर्जतमध्ये उपोषण
पारनेर : पारनेर तालुक्यात ‘महावितरण’ कडून शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, रोहित्रे जळाल्यानंतर दुरूस्ती व वाटपात होणारा दुजाभाव, दूधभाववाढ, दुष्काळी गावांमध्ये अनेक गावे वंचित राहिल्याने त्याचे फेरसर्व्हेक्षण करावे, दरोडे, चोऱ्यांचा तपास लावावा यासह इतर विविध प्रश्नी पारनेर तालुका राष्ट्रवादीच्यावतीने गुरूवारी पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
राष्ट्रवादीचे युवा नेते, जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर येथील महात्मा फुले चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. लाल चौक, मुख्य शिवाजी पेठ मार्गे मोर्चा पारनेर तहसीलवर धडकला. मोर्चात दुधाचे भाव वाढवा, शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करा, सबका साथ सबका विकास, शेतकरी केला भकास असे फलक झळकले. केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात येत होत्या.
पारनेर तालुक्यात वीजप्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळी स्थितीत अनेक गावांची पीकआणेवारी जास्त लागल्याने ते दुष्काळी सवलतींपासून वंचित आहेत, असे झावरे यांनी निदर्शनास आणून दिले. अशोक सावंत, संजीव भोर यांनीही वाळुचोरांवर कारवाई करताना पोलीस व तहसीलकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप केला. यावेळी सबाजी गायकवाड, अशोक सावंत, सभापती अरूण ठाणगे, उपसभापती भाऊ लामखडे, सोन्याबापू भापकर, प्रशांत गायकवाड, पोपट पवार, दीपक नाईक, विलास मते, योगेश मते, विक्रमसिंह कळमकर, पोपट शेटे, बबलू रोहोकले, संदीप कपाळे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
चिचोंली काळदात येथे टँकरची मागणी
कर्जत : कर्जत तालुका दुष्काळी जाहीर करावा तसेच इतर प्रश्नी कर्जत तालुका काँग्रेस तसेच चिंचोली काळदात येथील ग्रामस्थांनी पाण्याचा टँकर सुरू करावा, या मागणीसाठी कर्जत तहसील कार्यालयासमोर गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले.कर्जत तालुका काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. कर्जत तालुका दुष्काळी जाहीर करावा, जनावरांना चारा, शालेय विद्यार्थ्यांची फी माफ करावी, कमांडची अट रद्द करावी, पाण्याचा टँकर मिळावा, प्रत्यक्ष पहाणी करून आणेवारी जाहीर करावी, कर्जत बसस्थानक परिसर स्वच्छ करावा, शालेय संगणक फी रद्द करावी. टँकर घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत आदी मागण्यांसाठी कर्जत तालुका काँग्रेस समितीने उपोषण सुरू केले आहे. उपोषणास तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, उपसभापती प्रकाश शिंदे, पं.स. सदस्य किरण पाटील, युवा नेते संतोष धुमाळ, ‘त्रिमूर्ती’चे अध्यक्ष महेंद्र गुंड, सतिष पाटील, तात्यासाहेब ढेरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लालासाहेब सुद्रीक, बापूसाहेब काळदाते आदी सहभागी झाले आहेत.चिंचोली काळदात येथे टँकर मंजूर करावा यासाठी उपसरपंच रघुनाथ काळदाते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणास बसलेल्यांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. हंडे घेऊन महिला या उपोषणात सहभागी झाल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार
राष्टवादीच्या मोर्चाचे रूपांतर पारनेर तहसीलसमोर गेल्यावर ठिय्या आंदोलनात झाले. यावेळी सुजित झावरे यांच्यासह उपस्थितांनी ‘महावितरण’,पोलीस ,महसूल, कृषी, वन विभाग यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पोलिसांनी दारूबंदी विरोधात व अवैध धंद्यांविरोधात मोहीम सुरु करावी, आमच्यासह कोणाचाही दूरध्वनी आलातरी अशा लोकांना सोडू नका, असेही झावरे यांनी सांगितले. ‘महावितरण’चे उपअभियंता ए.एस.माने यांनी धोत्रे येथील वीज उपकेंद्राचे काम सुरू करण्यात येईल, जळालेली रोहित्रे लवकर दुरूस्त केले जातील, असे आश्वासन दिले. कृषी अधिकारी रामदास दरेकर यांनी सर्वांना शेततळे दिली जातील, असे सांगितले. अशोक सावंत यांनी रेशनचे धान्य शिरूरच्या व्यापारी पेठेत विक्री होत असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली.
पीक आणेवारीचे पुन्हा सर्र्वेक्षण
पारनेर तालुक्यात चुकीच्या पध्दतीने पीकआणेवारी लागली असल्याने सवलतींपासुन अनेक गावे वंचित राहत असल्याने पीक आणेवारीचे पुन्हा सर्वेक्षण करावे, अशी मागणी जि.प. सदस्य सुजित झावरे यांनी केली. तहसीलदार भारती सागरे यांनी उर्वरीत गावांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात येईल. त्यासाठी ग्रामपंचायत व गावात माहिती देऊन पीकआणेवारीसाठी सेवक जातील असे स्पष्ट केले.